भंडारा : विना परवानगी शाळेत शिरून शिक्षकांना मारहाण आणि तोडफोड करणाऱ्यांवर जवाहरनगर ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी महर्षी विद्या मंदिरच्या प्राचार्य श्रुती ओहळे यांनी येथे पत्रपरिषदेत केली.
महर्षी विद्या मंदिरमध्ये ४ जानेवारी रोजी पालकांच्या तक्रारीवरून आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते गेले होते. त्या ठिकाणी झालेल्या वादानंतर शाळेच्या वतीने जवाहरनगर ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्या तक्रारीवरून आमदार नरेंद्र भोंडेकर, प्रवीण उदापुरे यांच्यासोबत ५० जणांवर गुन्हे दाखल झाले. शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी ही घटना असून, या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी प्राचार्य ओहळे यांनी केली. याप्रकरणी आपण गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटणार असून, महामहिम राज्यपालांना पत्र पाठविल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार भोंडेकर चर्चा करण्यासाठी शाळेत आले होते तर मग शिक्षकांना मारहाण आणि तोडफोड कशी झाली, असा सवाल त्यांनी यावेळी करीत शिक्षण क्षेत्रात दहशत निर्माण करणाऱ्या प्रवीण उदापुरे यांना तडीपार करण्याचीही मागणी त्यांनी केली. पत्रपरिषदेला सेंट पिटर्स स्कूलचे जयप्रकाश, शिक्षक नवीनप्रभात, संजय आगाशे आदी उपस्थित होते.