जिल्ह्यात शुक्रवारी सर्वत्र गणेशोत्सवाला उधाण आले हाेते. बच्चे कंपनीसह सर्वांचीच गणपती बाप्पाला घरी नेण्याची लगबग सुरू हाेती. त्यातच सकाळपासून रिमझिम पाऊस बरसत हाेता. या रिमझिम पावसात ‘गणपती बाप्पा माेरयाऽऽ’ असा गजर करीत गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली. दसरा मैदानावर सकाळपासूनच भाविकांची गर्दी झाली हाेती. बच्चे कंपनीच्या चेहऱ्यावरील उत्साह अवर्णनीय हाेता. कुणी वाहनातून, तर कुणी थेट डाेक्यावरून गणपती बाप्पाला आपल्या घरी नेत असल्याचे चित्र हाेते. काेराेना संसर्गामुळे प्रशासनाने मिरवणुकीला बंदी घातली हाेती. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही मिरवणूक काढण्यात आली नाही.
भंडारा जिल्ह्यात यावर्षी २८६ सार्वजनिक गणेश मंडळे बाप्पांची स्थापना करणार आहेत, तर घरगुती गणेशांची संख्या ३१०५ राहणार आहे. भंडारा शहरात २८ सार्वजनिक, तर ७१० घरगुती गणेशांची स्थापना करण्यात आली.
बाॅक्स
पाेलिसांचा तगडा बंदाेबस्त
पाेलिसांनी गणेश उत्सवादरम्यान तगडा बंदाेबस्त लावला असून १६६३ पाेलीस कर्मचारी यासाठी तैनात करण्यात आले आहेत. अप्पर पाेलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या नेतृत्वात चार उपविभागीय पाेलीस अधीकारी, १७ पाेलीस निरीक्षक, ४८ सहायक पाेलीस निरीक्षक, ९९३ पाेलीस शिपाई आणि सहाशे हाेमगार्ड यांच्यासह एसआरपीचे एक दल तैनात करण्यात आले आहे. काेराेना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर पाेलीस कारवाई करणार आहे. नागरिकांनी सण, उत्सव शांततेत पार पाडावेत, असे आवाहन जिल्हा पाेलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी केले आहे.
बाॅक्स
२०८ ठिकाणी ‘एक गाव एक गणपती’
जिल्ह्यात गत काही वर्षांपासून एक गाव एक गणपती संकल्पना रुजविली जात आहे. जिल्ह्यात यावर्षी २०८ गावांमध्ये एक गाव एक गणपती उपक्रम राबविला जाणार आहे. गतवर्षी ६६ गावांत एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यात आला हाेता.