संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारातील विविध जलाशयांवर विदेशी पक्ष्यांचे आगमन झाले आहे. युरोप, आशिया, स्कॉटलँड आदी प्रदेशातून आलेल्या या पक्ष्यांमुळे जिल्ह्यातील जलाशयांचे सौंदर्य वाढले आहे. पक्षी निरीक्षक आणि अभ्यासकांसाठी ही सुवर्णसंधी आहे.भंडारा जिल्हा हा राज्यात तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. दीड हजारांच्या वर जिल्ह्यात तलाव आहेत. या तलावात सध्या विदेशी पक्ष्यांचा किलबिलाट सर्वांना मोहीत करीत आहे. साकोली तालुक्यातील अनेक तलावात गत १५ दिवसांपासून विदेशी पक्ष्यांचे आगमन होत आहे. त्यात राजहंस, चक्रवाक, शाही चक्रवाक, सरगम बडगा, चिखला बैस, सुंदरबटवा, खैराबाईज, शेंदऱ्याबाईज आदी विदेशी पक्ष्यांचा समावेश आहे. युरोप खंडात हिवाळ्यात थंडीमुळे जलाशय गोठतात. पक्ष्यांच्या अन्न व निवाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे हे पक्षी समशितोष्ण कटीबंधीत प्रदेशाचा आश्रय घेतात. भंडारा जिल्ह्यातील जलाशयात या पक्ष्यांसाठी विपूल खाद्य आहेत. त्यामुळे हे पक्षी नित्यनेमाने येत आहेत.हजारो मैलांचा प्रवास करून हे पक्षी आता दाखल झाले आहेत. जलाशयात जलविहार करताना पक्ष्यांचे हे मोहक रुप अनुभवण्यासाठी पर्यटकांसह पक्षीनिरीक्षक आणि अभ्यासनिरीक्षकांचीही गर्दी होत आहे. मात्र अलिकडच्या काळात या पक्ष्यांच्या शिकारीत वाढ झाल्याचे दिसत आहे. जिल्ह्याच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या पक्ष्यांचे जतन होण्याची गरज आहे.जिल्ह्यात दरवर्षी लाखोंच्या संख्येने विदेशी पक्षी येतात. यंदाही जिल्ह्यातील तलावांवर या पक्ष्यांचे आगमन झाले आहे. गत काही वर्षात शिकारीच्या घटनात वाढ झाली आहे. शासकीय स्तरावरही यासाठी कोणत्याच उपाययोजना होत नाही.-विनोद भोवते, पक्षी निरीक्षक, साकोली.
भंडारा जिल्ह्यात विदेशी पक्ष्यांचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 11:04 AM
तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारातील विविध जलाशयांवर विदेशी पक्ष्यांचे आगमन झाले आहे. युरोप, आशिया, स्कॉटलँड आदी प्रदेशातून आलेल्या या पक्ष्यांमुळे जिल्ह्यातील जलाशयांचे सौंदर्य वाढले आहे.
ठळक मुद्देपक्षी निरीक्षकांना संधी युरोप, आशिया, स्कॉटलँड मधील पाहुणे पक्षी