ग्रामस्थांनी मागितली आत्महत्येची परवानगी : शिवसेना करणार जनआंदोलनतुमसर : बाळापूर कॅम्प येथील खुल्या खाणीतून मॉयल प्रशासनाने मॅग्नीज काढणे सुरु केले. ब्लास्टींगमुळे घरांना व जिल्हा परिषद शाळेला तडे गेले असून सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. कृत्रिम भूकंपाचे धक्के, धूळ, मॉईलचे सांडपाण्यामुळे येथे ग्रामस्थांना नरकयातना भोगाव्या लागत असल्याने ग्रामस्थांनी मॉईल प्रशासनाच्या विरोधात एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. डोंगरी (बु.) बाळापूर कॅम्प येथे केंद्र शासनाची मॅग्नीजची खुल्या खाणी आहेत. बाळापूर येथील ग्रामस्थांनी सन १९६० च्या पूर्वी येथे घरे बांधली होती. बाळापूर (हमेशा) या गावाची लोकसंख्या ८५० ते ९०० इतकी आहे. १९७७ मध्ये मॉईल प्रशासनाने प्रत्यक्ष येथून मॅग्नीजचे उत्खनन करणे सुरु केले. मॅग्नीज उत्खनन करण्याकरिता येथे दररोज ब्लास्टींग करण्यात येते. ब्लास्टींगमुळे येथील घरांना व जि.प. शाळेला तडे गेले आहे. दररोज या गावाला कृत्रिम भूकंपाचे धक्के सहन करावे लागतात. ब्लास्टींगवेळी धक्के, धूळ येथे दररोज निदर्शनात येते, नियमानुसार ब्लास्टींगचे अंतर ५०० मीटरपेक्षा जास्त असणे गरजेचे असतांनी हे अंतर गावापासून केवळ १०० ते १५० मीटर आहे.मॉयल प्रशानाने कर्मचाऱ्यांची वसाहत चांदमारा येथे स्थलांतरीत करणे सुरु केले. तर ग्रामस्थांना अशा भितीमुक्त वातावरणात ठेवण्यात बाध्य केले. मॉईलने २००९ मध्ये लिजवर घेतल्याचे दर्शविले, परंतु त्यापूर्वीच येथे मग्नीज उत्खनन करणे सुरु केले. नियमानुसार डॅम्पींग ३० मीटर उंच असणे आवश्यक आहे. परंतु येथे १०० ते १२५ मीटर डम्पींग (वेस्टेज मटेरियल) मानवनिर्मित दगडांच्या रांगा पाहावयास मिळतात. यामुळे सकाळी सुर्यप्रकाश, शुध्द हवा येथील ग्रामस्थांना मिळत नाही.वन व झुडपी जंगलाची जागा गट क्रमांक ९६ (५० एकर) गावठान जागा हस्तगत करण्यात आली. सन १९९३ पासुन ठेकेदारी पध्दती बंद असतांनी येथे केवळ ९० ते १०० रुपये मंजूरी मजूरांना देण्यात येत आहे. १० टक्के विकासात्मक कामावर खर्च करण्याचा नियम असताना परिसरात एक टक्काही खर्च केला नाही. यापूर्वी धरणे प्रदर्शन, मोर्चा व साखळी उपोषण करुन मॉईल व शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले, पंरतु उपयोग झाला नाही. पुढे सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा व ग्रामपंचायत सदस्य धर्मेंद्र धकाता, रितेश ठाकरे, विजय बर्वे, कृष्णा ठाकरे यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)
बाळापूरला कृत्रिम भूकंपाचे ‘धक्के’
By admin | Published: March 21, 2016 12:27 AM