दिघोरी (मोठी) : जिल्ह्यात झालेल्या मुबलक पावसाने सिंचन प्रकल्प तुडुंब भरले आहेत. पाण्याची सहज उपलब्धता असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विविध पिकांची लागवड केली. त्यामुळे जिल्ह्यात रासायनिक खतांची मागणी वाढत आहे. परंतु, सध्या जिल्ह्यात रासायनिक खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे. रासायनिक खतांचा साठा जिल्ह्याच्या रॅक पाॅइंटवर उतरवला खरा; परंतु, अद्यापही किरकोळ विक्रेत्यांना खत देण्यात आले नाही. रासायनिक खतांवर अधिभार लागला असल्याची बतावणी करीत साठेबाजी केली जात आहे. खत कंपन्यांना दरवाढीचे वेध लागल्याचे बोलले जात आहे.
भंडारा जिल्हा प्रमुख भात उत्पादक जिल्हा आहे. यासोबतच भाजीपाला आणि गव्हाचे पिकही घेतले जाते. यंदा प्रकल्पांमध्ये मुबलक पाणी असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विविध पिकांची लागवड केली. या पिकांना आता रासायनिक खतांची गरज आहे. परंतु, किरकोळ विक्रेत्यांकडे रासायनिक खतच उपलब्ध नाही. अनेक शेतकरी किरकोळ विक्रेत्यांकडे जाऊन रासायनिक खतांची मागणी करतात. परंतु, त्यांच्याकडेच साठा नसल्याने ते हतबल झाले आहे.
गत आठवड्यात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यासाठी तीन कंपन्यांच्या रासायनिक खताची रॅक आल्याची माहिती आहे. हा सर्व खतसाठा कोणत्याही किरकोळ विक्रेत्याला दिला गेला नाही. त्यामुळे कंपनी व घाऊक विक्रेते साठेबाजी करून दरवाढीची प्रतीक्षा तर करीत नाही ना? असा संशय व्यक्त केला जात आहे. योग्य वेळी शेतकऱ्यांना रासायनिक खत मिळाले नाही, तर त्याचा पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच काही शेतकरी चढ्या भावात खत खरेदी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बाॅक्स
कृषी आयुक्तालयाकडून गंभीर दखल
पुणे येथील कृषी आयुक्तालयाच्या वतीने जिल्हानिहाय रासायनिक खत उपलब्धतता आढावा घेण्यात आला. त्यात काही जिल्ह्यांत खत उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्यावरून कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी २४ फेब्रुवारी रोजी खत उत्पादक कंपन्यांना ई-मेल पाठविला. त्यात त्यांनी खत पुरवठादार कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात खतसाठा घाऊक विक्रेत्यांच्या गोदामात तसेच खासगी कंपन्यांत साठवणूक केला जात असल्याचे तसेच बहुतांश किरकोळ विक्रेत्यांना खते उपलब्ध करून दिली जात नसल्याचे निदर्शनास आणून दिले. ही बाब गंभीर स्वरूपाची असून शेतकऱ्यांपर्यंत खते न पोहोचल्यास केंद्रीय खत अनुदान थांबविण्याचे निर्देशही दिले.
कृषी अधिकाऱ्यांना दिले निर्देश
साठेबाजीला आळा बसावा व किरकोळ विक्रेत्यांमार्फत शेतकऱ्यांना मुबलक साठा उपलब्ध व्हावा यासाठी कृषी आयुक्तालयाच्या वतीने सर्व कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व कृषी विकास अधिकाऱ्यांना याबाबत कारवाई करण्याचे निर्देश एका पत्रातून दिले आहेत. आता याची कितपत अंमलबाजवणी होते याकडे भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील किरकोळ रासायनिक खत विक्रेते आणि शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.