मोहन भोयर
तुमसर (भंडारा) : मुंबई-हावडा मार्गाच्या रेल्वे ट्रॅकवरून गोंदियाकडे जाणाऱ्या मालगाडीच्या नऊ डब्यांचे (वाघिणी) कपलिंग तुटल्याने इंजिनपासून डबे वेगळे झाले. मात्र इंजिनचालकाच्या ते लक्षात न आल्याने इंजिन सुसाट समोर निघाले. मालगाडीच्या गार्डला लक्षात येत असताना वाॅकीटाॅकीवर इंजिनचालकांशी संपर्क साधून तत्काळ माहिती दिली. त्यामुळे अनर्थ टळला. मुंबई-हावडा मार्गाच्या डाऊनट्रॅकवर त्यामुळे एक तास रेल्वे वाहतूक खोळंबली होती. प्रकार रविवारी सकाळी सातच्या सुमारास घडला. यामुळे रेल्वे प्रशासनात एकच खळबळ माजली होती.
मुंबई-हावडा रेल्वेमार्गावर २४ तासांत सुमारे १२० मालगाड्या धावतात. हा लोहमार्ग अतिशय व्यस्त आहे. रविवारी सकाळी सात वाजता तुमसर रोड रेल्वे जंक्शनवरून डाऊन मार्गावर मालगाडी सुसाट निघाली. रेल्वे फाटक क्रमांक ५३२ जवळ कपलिंग तुटल्याने इंजिन व त्यामागील सुमारे दहा ते पंधरा डबे घेऊन रेल्वे इंजिन सुसाट पुढे निघाले; परंतु कपलिंग तुटल्याने मालगाडीच्या नऊ डबे (वाघिणी) मागे राहिल्या.
अचानक गाडीची गती कमी का झाली, हे गार्डच्या लक्षात आले. त्यांनी डोकावून बघितले असता रेल्वे इंजिन मालगाडीचे बारा ते तेरा डबे घेऊन सुसाट धावताना त्यांना दिसले. मालगाडीच्या गार्डने तत्काळ इंजिनचालकाशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. इंजिनचालकाने तत्काळ गाडी थांबविली. वाॅकीटाकीच्या संपर्क क्षेत्राच्या बाहेर रेल्वे इंजिन गेले असते तर मोठा अनर्थ घडला असता, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.
डाऊन मार्गावर सुमारे एक तास रेल्वेची वाहतूक खोळंबली होती. त्यानंतर तांत्रिक अडचण दूर करून मालगाडी पुढे सोडण्यात आली. घडलेल्या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती आहे.