काँग्रेसमध्ये कॉम्पिटिशन असल्याने वडेट्टीवारांना बोलावेच लागते, बावनकुळे यांनी काढला चिमटा
By गोपालकृष्ण मांडवकर | Published: August 26, 2023 04:34 PM2023-08-26T16:34:51+5:302023-08-26T16:37:43+5:30
भाजपाच्या जनसंवाद यात्रेसाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज शनिवारी दुपारी भंडाऱ्याला आले होते.
भंडारा : विजय वडेट्टीवारहे आता काँग्रेसचे नवीनच विरोधी पक्षनेते झाले आहेत. त्यामुळे त्यांना बोलावेच लागते. काँग्रेस पक्षामध्ये सध्या कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे कोण जास्त बोलतात हे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला दाखवण्यासाठी ते बोलतात. त्यामुळे यात काही फारसे मनावर घेण्यासारखे नाही, असा चिमटा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढला.
भाजपाच्या जनसंवाद यात्रेसाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज शनिवारी दुपारी भंडाऱ्याला आले होते. स्थानिक गांधी चौकातून त्यांच्या जनसंवाद यात्रेला प्रारंभ झाला. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर पत्रकारांनी त्यांना गाठले. यावेळीची २०२४ ची भाजपची निवडणूक अखेरची ठरणार, अशी टिप्पणी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती. या संदर्भात त्यांना छेडले असता त्यांनी वरील वक्तव्य केले. ते म्हणाले, कोण जास्त बोलतात, हे पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला दाखवण्यासाठी सध्या काँग्रेसमध्ये असे सुरू आहे. आता विरोधी पक्षनेते असल्यामुळे त्यांना तसे बोलावेच लागते, त्याला आम्ही काय करू शकतो, अशी टीका बावनकुळे यांनी केली.
जनसंवाद यात्रेबद्दल बावनकुळे म्हणाले, जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून भंडारा - गोंदिया लोकसभा क्षेत्रातील साडेतीन लाख नागरिकांच्या घरापर्यंत जाण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये झालेल्या विकासकामांची आणि निर्णयांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही जनसंवाद यात्रा आहे.
व्यापारी, जनतेशी साधला संवाद
गांधी चौकातून त्यांचा जनसंपर्क सुरू झाला. मार्गात महात्मा गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि त्रीमूर्ती चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्यांनी अभिवादन केले. मार्गातील व्यापारी, फुटपाथवरील विक्रेत्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर पोलिस सभागृहात जिल्ह्यातील तीनही विधानसभा प्रमुखांची बैठक घेऊन तासभर मार्गदर्शन साधला.
सामाजिक क्षेत्रातील प्रमुखांच्या घरी भेटी
या दौऱ्यादरम्यान बावनकुळे यांनी तैलिक समाजाचे जिल्हा अध्यक्ष कृष्णराव बावणकर, जैन कलार समाजाचे अध्यक्ष राजीव बन्सोड, कुणबी समाजाचे नेते डॉ. प्रकाश पडोळे आणि भाजपाचे अनुसूचीत जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रामकुमार गजभीये यांच्या निवासस्थानी जाऊन भेटी घेतल्या व चर्चा केली. या दरम्यान, इस्त्रोमध्ये काम करणारे गौरव लंजे यांच्या सहकार नगरातील निवासस्थानी जाऊन त्यांचे वडील यशवंत लंजे यांची भेट घेतली आणि शाल-श्रीफळ देऊन मुलाच्या कामगिरीबद्दल आईवडीलांचा सत्कार केला.