गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा : मोहाडी तालुक्यातील पालोरा येथील शालिनी चरणदास तिरपुडे (५२) या आशा वर्करचा मृतदेह गावाजवळील विहिरीत सकाळी तरंगताना आढळून आला. पोलिसांनी प्रेत बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठविले आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.
शालिनी तिरपुडे २३ जूनला सकाळी घरून निघाली होती. सकाळी बहीण सुनीता ही झोपेतून उठल्यावर शालिनी घरी दिसली नाही. बहिणीने शेजारी चौकशी केली. मात्र, ती न दिसल्याने कामानिमित्त गेली असावी, असे समजून पोलिसात न कळविता ती घरीच राहिली. दरम्यान, शनिवारी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान, गुरे चारण्यासाठी गावालगतच्या शेतशिवारात गेलेल्यांना हितेश बाबूराव मेश्राम यांच्या विहिरीजवळ चप्पल व स्कार्फ दिसला. गुराख्यांनी विहिरीजवळ जाऊन पाहिले असता, आत पाण्यावर महिलेचे प्रेत तरंगताना दिसले. त्यांनी पोलिस पाटील विरेंद्र रंगारी व पोलिसांना माहिती दिली.
करडीचे ठाणेदार राजेंद्र गायकवाड यांनी घटनास्थळी पोहोचून गावकऱ्यांच्या मदतीने प्रेत बाहेर काढले. महिलेची ओळख पटल्यानंतर बहीण सुनीता तिरपुडे यांना माहिती देऊन घटनास्थळी बोलविले. काल सकाळपासून शालिनी घरी आलीच नसल्याचे तिने पोलिसांना सांगितले. बिट हवालदार प्रफुल्ल वालदे यांनी पंचनामा करून प्रेत तुमसर येथे शवविच्छेदनाकरिता पाठविले. पुढील तपास पोलिस हवालदार प्रफुल्ल वालदे, चालक विनायक बावणे, पोलिस शिपाई प्रमिला मानकर, निरंजन कडव करीत आहेत.