आमसभेत घेतला ठराव : गुरुदेव सेवा मंडळाने घेतला पुढाकारतुमसर : ‘सोडा रे सोडा दारुला, ओळखा आपल्या माणुसकीला’ या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनाने प्रेरीत होऊन दारुच्या आहारी गेलेल्यांनी दारु सोडली. मग आम्ही का नाही यासाठी तुमसर तालुक्यातील आष्टीवासीय एकत्र आले. या ग्रामस्थांनी गावात दारुबंदीसाठी विशेष आमसभा बोलाविली. या आमसभेत दारुबंदीचा ठराव एकमताने गावात मांडण्यात आला आणि सर्वानुमते तो पारितही झाला.तुमसर तालुक्यातील आष्टी गावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे मोठ्या प्रमाणात अनुयायी असून गावात श्री गुरुदेव सेवा मंडळही कार्यरत आहे. राष्ट्रसंतांची महती सामान्य माणसाला कळावी, या उदात्त हेतूने दरवर्षी सेवा सप्ताह येथे साजरा करण्यात येत असतो. त्यात भजन किर्तनाच्या स्पर्धा घेण्यात येतात. परंतु आष्टी या गावात एक नव्हे तर चाळीसच्या वर घरात मोहफुलाची दारु विक्री करणाऱ्यांची संख्या आहे. परिणामी हे गाव दारुच्या व्यसनाआहारी गेले आहे. हे गाव राष्ट्रसंतांच्या विचारांचे पाईक म्हणून ओळखले जात असले तरी येथील परिस्थिती वेगळी होती. या गावात राष्ट्रसंतांच्या शिकविणीचा विसर होत चालला होता. हा प्रकार वाढत असल्याचे पाहून गावातील सर्व गावकरी ग्रामपंचायत कमेटी, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी, शाळा समिती सदस्य, महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, मदतनिस, बौद्ध महासभा समितीचे सर्व पदाधिकारी श्री गुरुदेव सेवा मंडळात एकवटले व सर्वानुमते ठराव पारीत केला. यावेळी सरपंच प्रीती सोनवाने, शिशुपाल गौपाले, पंचायत समिती सदस्य, ठाणेदार मनोज वाढीवे, उपसभापती शेखर कोतपल्लीवार, डॉ.अमृत सोनवाने, पार्वता नागपुरे यांच्यासह गावातीलच नागरिक उपस्थित होते. या आमसभेचे संचालन फारुक दुधगोरे यांनी तर आभारप्रदर्शन बालचंद नागपुरे यांनी केले. (शहर प्रतिनिधी)
दारुबंदीसाठी आष्टीवासी एकवटले
By admin | Published: December 24, 2015 12:34 AM