भंडारा : उसने दिलेले पैसे मागण्यासाठी गेलेल्या तरुणावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करण्याची घटना भंडारा तालुक्यातील चिखली येथे सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली.
बादल मेश्राम रा.चिखली असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी रोशन जयदेव आकरे (२५), प्रशांत जयदेव आकरे (२९), जयदेव आकरे (५५) रा.चिखली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गावातील दिपांशू अनिल रंगारी आपला मित्र बादल मेश्राम, स्वप्नील भालेराव याच्यासोबत रोशन आकरे याला दिलेले उसनवार पैसे मागण्यासाठी गेला होता. त्यावेळी रोशनने तुला कशाचे पैसे देऊ, माझ्या घरापर्यंत आलाच कसा असे म्हणत वाद सुरु केला. या वादात जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली.
आरोपी एवढ्यावरच थांबले नाही तर, रोशनने घरातून कुऱ्हाड आणून बादलच्या डोक्यात मारली. त्यामुळे तो गंभीर जखमी होऊन खाली पडला. तर प्रशांत जयदेव यांनी लोखंडी राॅडने मारहाण केली. त्यात तो बेशुद्ध झाला. मित्र स्वप्निल भालेराव मधात गेला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. जखमीला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिपांशूने दिलेल्या तक्रारीवरुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.