कंत्राटदाराच्या खसऱ्याला मिळते ‘क्लीन चिट’ : लाखांदूरातील शेतकऱ्यांची वनमंत्र्यांकडे तक्रारलाखांदूर : शेतकऱ्याचे खसरे प्रकरणाला नाकारून कंत्राटदारांच्या खसरे प्रकरणाला क्लीन चिट देणारे साकोली येथील वनविभागाचे सहायक वनसंरक्षक हे शेतकऱ्यासाठी कर्दनकाळ ठरले आहेत. नाहक शेतकऱ्यांना त्रास देऊन कंत्राटदारांच्या मर्जीने काम करीत आहेत, असा आरोप करीत शेतकऱ्यांनी राज्याचे वन तथा वित्तमंत्री सुधीर मूनगंटीवार यांच्याकडे लेखी तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे. गत पाच महिन्यांपासून लाखांदूर वन परिक्षेत्राधिकारी कार्यालयातील तीन वन परिक्षेत्राधिकाऱ्यांची बदली झाली. याच कालावधीत सहायक वनसंरक्षक साकोली हे मात्र कायम असल्याने खसरे प्रकरणात सावळागोंधळ करण्यासाठी त्यांना चांगलेच जमले. लाखांदूर वन परिक्षेत्राधिकारी कार्यालयात नोव्हेबर २०१५ पासून शेतकरी व कंत्राटदाराचे खसरे प्रकरण अधिकाऱ्यांच्या बदल्यामुळे रखडले. परंतु यात कंत्राटदारांचे प्रकरण पटकन पास करून शेतकऱ्यांचे प्रकरण एक ना अनेक त्रृट्या पुढे करून साकोली कार्यालयात रेंगाळत ठेवण्यात आले. खसरे प्रकरणाच्या फाईली लाखांदूर ते साकोलीत अजूनही फिरत आहेत. तोडलेली लाकडे शेतात पडून आहेत काही शेतकऱ्यांनी तोडलेली लाकडे पावसाच्या व चोरीच्या भीतीने सुरक्षित स्थळी आणून ठेवली. आज ना उद्या साकोली येथील वनविभागाचे सहायक वनसंरक्षक हे पासिंग करून देतील म्हणून काही शेतकऱ्यांनी आपली शेती पडीक ठेवून खरिपाची पीक न घेता आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत.शेतकऱ्यानी स्वत: केलेल्या खसऱ्याचे प्रकरण पुन्हा पाच ते सहा महिने फाईल बंद ठेवा. कंत्राटदारांचे प्रकरण तात्काळ निकाली काढण्याचे फर्मान साकोली येथील वनविभागाचे सहायक वनसंरक्षकानी काढल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. मागील ७ ते ८ माहिन्यांपासूनचे खसरे प्रकरणाची तपासणी केली असता एकही शेतकऱ्याचे स्वत: केलेले प्रकरण निकाली निघाल्याचे दिसून येत नाही. मात्र कंत्राटदारांचे संपूर्ण प्रकरण कमिशनपोटी तात्काळ निकाली निघाल्याचे तपासात दिसून येते. यापुर्वी पास केलेले खसरे प्रकरणाची झाडाच्या बुंध्यासकट मोजणी केली असता अवैध वृक्ष कटाईचे मोठे घबाड उघडकीस यायला वेळ लागणार नाही. जंगलातील चोरीचे लाकडे कंत्राटदारांनी मिसळवून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मूक संमती दिल्याचे सर्वत्र बोलल्या जात आहे. मात्र प्रामाणिकपणे नियमाचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना वनविभागाकडून ठेंगा दाखवला जात आहे.साकोली येथील वनविभागाचे सहायक वनसंरक्षक यांनी वारंवार होणाऱ्या वन परिक्षेत्राधिकारी यांच्या बदल्यांचा फायदा घेत नियमबाह्यरित्या जुन्या तारखेत अनेक प्रकरण निकाली काढल्याचे दबक्या आवाजात बोलल्या जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना वेठीस धरून कंत्राटदारांना पाठबळ देणाऱ्या साकोली येथील वनविभागाचे सहायक वनसंरक्षक यांच्या संपूर्ण कामकाजाची चौकशी व शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी राज्याचे वन तथा वित्तमंत्री सुधीर मूनगंटीवार यांच्यांकडे लेखी तक्रारीतून शेतकऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
सहायक वनसंरक्षकांचा शेतकऱ्यांच्या खसऱ्याला ठेंगा
By admin | Published: August 04, 2016 12:35 AM