प्राथमिक आरोग्य केंद्रास रिक्त पदांचे ग्रहण
मुरमाडी/तूप येथील प्रकार : अर्हताधारक वैद्यकीय अधिकारी नाही
रुग्णांची होते गैरसोय
लाखनी : मनुष्यबळाचा अभाव असतानाही कार्यरत वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णांना योग्य ती सेवा पुरविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. कोविड १९ च्या दुसऱ्या लाटेत अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी संक्रमित झाल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचा प्रत्यय मुरमाडी/तूपकर प्राथमिक आरोग्य केंद्रात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पूर्ण जागा भरल्या असल्या तरी एमबीबीएस अर्हताधारक डॉक्टर नाही. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांची १३ पदे रिक्त असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रास रिक्त पदाचे ग्रहण लागले म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
लाखनी तालुक्याचे पूर्वेकडील अंतिम टोक असलेल्या व चूलबंद नदी खोरे तथा वनव्याप्त व दुर्गम भूप्रदेश अशी ख्याती प्राप्त मुरमाडी, तूप परिसरात दारिद्र्यरेषेखालील कुटुंब, अल्प-अत्यल्प शेतकरी तथा भूमिहीन शेतमजूर कुटुंबांची संख्या अधिक असल्याने मागास प्रदेश म्हणून ओळख आहे. या कुटुंबांना नाममात्र शुल्कात व परिसरातच आरोग्य सेवेचा लाभ देता यावा. याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली.
मुरमाडी/तूप प्राथमिक आरोग्य केंद्राचे कार्यक्षेत्रात दोन आयुर्वेदिक दवाखाने, सहा आरोग्य उपकेंद्र आणि २९ गावे समाविष्ट असून, ३० हजार लोकसंख्येला आरोग्य सेवा पुरविण्याची जबाबदारी या आरोग्य केंद्रावर देण्यात आली असली तरी रिक्त पदांमुळे पाहिजे त्या प्रमाणात सेवा दिली जात नाही असे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे म्हणणे आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची ३६ पदे, समुदाय आरोग्य अधिकारी सहा पदे मंजूर असली तरी एक आरोग्य सहायिका , ६ आरोग्यसेविका, वाहन चालक १, परिचर ३, सफाई कामगार १ आणि अंशकालीन महिला परिचर १ अशी एकूण १३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. वैद्यकीय अधिकारी डॉ. सोहन मरसकोल्हे यांच्या नेतृत्वात कारभार सुरू असला तरी दिघोरी येथील समुदाय आरोग्य अधिकारी यांना प्रती नियुक्तीवर भंडारा येथे पाठविण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त असून, आधीच रिक्त पदांचा सामना करणाऱ्या या दुर्गम परिसरातील वैद्यकीय अधिकाऱ्याची प्रतिनियुक्ती करणे अनाकलनीय आहे.
बॉक्स
उपकेंद्रांची परिस्थिती गंभीर
मुरमाडी/तूपकर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सहा उपकेंद्र येत असले तरी खराशी, पालांदूर, मरेगाव, कोलारी व दिघोरी येथील आरोग्यसेविकेचे पद रिक्त असल्यामुळे स्तनदा व गरोदर माता, तसेच अंगणवाडीतील तीन ते सहा वर्षे वयोगटांतील बालकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो.
बॉक्स
तीन वैद्यकीय अधिकारी संक्रमित
मुरमाडी/तूपकर प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी, मेंढा व खराशी येथे प्रत्येकी एक आणि उपकेंद्र स्तरावर सहा समुदाय आरोग्य अधिकारी नियुक्त आहेत. त्यामुळे बाह्यरुग्ण विभाग इतर दैनंदिन कामे लसीकरण, तसेच अँटिजेन चाचणी शिबिर व लसीकरणाचे काम योग्यरितीने सुरू होते. पण, तीन वैद्यकीय अधिकारी व दोन आरोग्य कर्मचारी कोरोना संक्रमित असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामकाज प्रभावित झाले आहे.