लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत कन्टेन्मेंट झोनमधील एटीएम फोडून चोरट्यांनी नऊ लाख ४१ हजार रुपये पळविण्याच्या घटनेला आता दोन आठवडे झाले तरी अद्याप चोरट्यांचा थांगपत्ता लागला नाही. सीसीटीव्हीचे स्पष्ट फुटेज नसल्याने तपासात अडचणी येत आहेत. भंडारा पोलिसांचे एक पथक चोरट्यांचा शोध घेत असून एटीएम फोडण्यासाठी वापरलेले गॅस सिलिंडर आणि वाहनावर तपास केंद्रीत करण्यात आला आहे. एटीएम फोडणारे चोरटे आंतरराज्यीय टोळीचे सदस्य असल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस पोहचले असले तरी तपासात मात्र कोणतीच गती दिसत नाही.भंडारा शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील इंद्रप्रस्थ कॉम्प्लेक्समधील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्याची घटना ४ जुलैच्या पहाटे उघडकीस आली होती. चोरट्यांनी या एटीएममधून ९ लाख ४० हजार रुपये लंपास केले होते. विशेष म्हणजे एटीएम असलेला परिसर कोरोना रुग्ण आढळल्याने कन्टेन्टमेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आला होता. या परिसरात पोलिसांचा पहारा असताना ही चोरी झाली होती. चोरी झाल्याचे उघड होताच पोलिसांनी विविध मार्गांनी चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न चालविला. परंतु चोरट्यांनी कोणताही पुरावा मागे ठेवला नाही. विशेष म्हणजे एटीएम मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण अगदी अस्पष्ट आहे. परिसरातील कोणताही सीसीटीव्ही कॅमेरा त्या काळात सुरु नव्हता. त्यामुळे पोलिसांचा तपास सुरुवातीलाच दिशाहीन झाला.सध्या पोलिसांचे एक पथक या चोरट्यांचा शोध घेत आहेत. नागपूर ग्रामीण मध्ये एटीएम फोडण्याची घटना अलिकडे घडली. त्या ठिकाणी एक सिलिंडर आढळून आले. या सिलिंडरवरून कोण्या राज्यातील आहे याचा शोध घेऊन चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न आहे. परंतु त्यातही अद्याप यश आले नाही. तसेच राष्ट्रीय महामार्गावर टोल नाक्यावरून गेलेल्या वाहनांचा तपास केला जात आहे. त्या रात्री गेलेल्या वाहनांपैकी २४ वाहनांवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. चोरटे नागपूर मार्गे येऊन त्याच मार्गे परत गेले की, तुमसर मार्गे याचाही तपास घेतला जात आहे. तुर्तास तरी पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही.जिल्ह्यात यापूर्वीही एटीएम फोडण्याचे प्रयत्न झाले आहेत. मात्र अद्यापपर्यंत एटीएम फोडणारे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. तुमसर येथील एटीएम फोडण्याच्या प्रकाराला आता दोन वर्ष उलटले तरी चोरट्यांचा थांगपत्ता नाही. त्यामुळे भंडारा शहरातील एटीएम फोडीच्या घटनेचे कोडे उलगडणार काय? असा प्रश्न आहे.आंतरराज्यीय टोळीच्या सहभागाची शक्यताभंडारा शहरात झालेल्या एटीएम फोडण्याच्या घटनेत स्थानिक अथवा राज्यातील टोळी असण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. पोलिसांनी वेगवेगळ्या माध्यमातून याचा शोध घेतला असता आंतरराज्यीय टोळीचा सहभागावरच पोलिसांचे एकमत दिसत आहे. विशेष म्हणजे ज्या पद्धतीने आणि वेगाने एटीएम फोडण्यात आले त्यावरून ही टोळी सराईत असावी असा संशय आहे. राजस्थानातील टोळीवर पोलिसांचा संशय असला तरी अद्यापपर्यंत पोलिसांच्या हाती मात्र काहीही लागले नाही.
एटीएम चोरट्यांचा अद्यापही थांगपत्ता नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 5:00 AM
भंडारा शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील इंद्रप्रस्थ कॉम्प्लेक्समधील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्याची घटना ४ जुलैच्या पहाटे उघडकीस आली होती. चोरट्यांनी या एटीएममधून ९ लाख ४० हजार रुपये लंपास केले होते. विशेष म्हणजे एटीएम असलेला परिसर कोरोना रुग्ण आढळल्याने कन्टेन्टमेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आला होता. या परिसरात पोलिसांचा पहारा असताना ही चोरी झाली होती.
ठळक मुद्देनऊ लाख पळविले होते : पोलिसांचा तपास वाहन आणि सिलिंडरवर केंद्रीत, घटनेला झाले १५ दिवस