चर्चा न करताच अभियंते परतले : शेतकऱ्यांचा पाणी चोरीचा अभियंत्यावर आरोप लाखांदूर : इटियाडोह पाटबंधारे विभागाचे पाणी लाखांदूर तालुक्याला मिळत नसल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांनी मुख्य नहरावर हल्लाबोल केला. लाखांदूरचे पाणी गडचिरोली जिल्ह्यात देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी करताच उपविभागीय अभियंत्यासोबत शाखा अभियंता हे चर्चा न करताच परतल्यामुळे अखेर शेतकऱ्यांनीच नहराचे गेट उघडून पाणी सुरु केले.इटियाडोह पाटबंधारे विभागाचे पाणी भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्र सिंचित करते. यंदा अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्यांनी आपला मोर्चा धरणाच्या पाण्याकडे वळविला. मात्र, गडचिरोली जिल्ह्यातील अभियंते लाखांदूर तालुक्यातील नहराचे गेट बंद केल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर मुख्य नहरावरच वडसा, वडेगाव, लाखांदूर, आरमोरी व कोरंभी येथील अभियंत्यांना जाब विचारण्यासाठी हल्लाबोल केला. दरम्यान वडसा येथील उपविभागीय अभियंता गोहाटे व शाखा अभियंता टी.के. मेंढे यांनी शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा बघून चर्चा न करताच तिथून पळ काढला.इटियाडोह धरणाचा मुख्य कालव्यातून मुख्यत: ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्याची क्षमता असताना तेवढेच पाणी कालव्याद्वारे सुरु आहे. सर्वाधिक पाण्याचा वापर गोठणगाव व अर्जुनी (मोरगाव) तालुक्यात होत असल्यामुळे लाखांदूर व वडसा-आरमोरी तालुक्याला पाण्याचा पुरेपूर पुरवठा होत नाही. या पाटबंधारे विभागाअंतर्गत ५५ पाणी वापर सहकारी संस्था तयार करण्यात आले आहेत. यापैकी लाखांदूर शाखेंतर्गत आठ व बारव्हा शाखेअंतर्गत चार पाणी वापर सहकार संस्थेंतर्गत पाण्याचे नियोजन केले जाते. लाखांदूर तालुक्याला २५० क्युसेक पाण्याची गरज असताना केवळ १३५ क्युसेक पाण्याचा पुरवठा केला जातो. गडचिरोली जिल्ह्यासाठी ४५० क्युसेक पाण्याची गरज असताना ६५० क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातो. बारव्हा शाखेंतर्गत २,७०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. वडसा व आरमोरी शाखेअंतर्गत आठ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येतो. मुख्य नहरातून दोन्ही जिल्ह्याला पाणी वाटप होते. वडसा येथील उपविभागीय अभियंते व शाखा अभियंता हे लाखांदूर तालुक्यातील शेतकरी व अभियंत्यांना विश्वासात न घेता, नहराचे दरवाजे उघडणे व बंद करीत असल्यामुळे लाखांदूर तालुक्याला अत्यल्प पाणी मिळत होते. पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे धानपीक करपू लागले आहे. त्यामुळे बारव्हा व लाखांदूर शाखेअंतर्गत पाणी वापर संस्था असताना शेकडो संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य नहरावर हल्लाबोल करीत अभियंत्याला पकडले. शेतकऱ्यांशी चर्चा न करता परतल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी लाखांदूर येथील शाखा अभियंता वाहुले यांना निवेदन सादर करुन त्यांच्या उपस्थितीत नहराचे दरवाजे उघडले. पाटबंधारे विभागाच्या नियोजनाअभावी शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याचा आरोप करुन यापुढे नियमित पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संस्थेच्या अध्यक्षांनी दिला. यावेळी दादाजी डांगे रा.जैतपूर, रमेश पारधी रा.लाखांदूर, श्रावण मैंद रा.जैतपूर, डोमा कुळमते रा.मानेगाव, सुका लंजे रा.दांडेगाव, दिलीप वासनिक रा.चप्राड, इसन देशमुख रा.चप्राड, अंताराम हजारे, प्रभाकर राऊत, धनराज ढोरे यांच्यासह शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)नियोजनशून्य कारभाराचा फटकाइटियाडोह पाटबंधारे विभांतर्गत पाण्याचा विसर्ग १३०० क्युसेक मीटर व्हावा, यासाठी शासनाचे १०० कोटी खर्च करुन अनेक महत्त्वाची कामे करण्यात आली. परंतु, पाण्याचा विसर्ग ११०० क्युसेक मीटर आहे. १० कोटींचा निधी माती व मुरुम कामासाठी खर्च करण्यात आला. कृषीपंपाना नियम धाब्यावर बसवून पाणी देण्यात येते. यात अभियंत्याचा नियोजन शुन्य कारभार कारणीभूत असल्याचा आरोप नामदेव सोरते यांनी केला. अभियंत्यावर गुन्हे दाखल करावडसा व आरमोरी येथील शाखा अभियंता हे मुख्य कालव्याचे गेट संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेता किंवा पाणी वापर संस्थाना विचारात न घेता नियमाची पायमल्ली करीत. जास्तीत जास्त पाणी कॅनलचे गेट उघडे करुन व लाखांदूर शाखेतील गेट बंद करुन चोरुन नेत असल्याचा आरोप करीत आठही संस्था अध्यक्षांनी वडसा येथील शाखा अभियंता टी. के. मेंढे व उपविभागीय अभियंता गोहाटे यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा नहरावर हल्लाबोल
By admin | Published: September 16, 2015 1:18 AM