शेतकऱ्यांत चिंतेचे सावट : वैनगंगेच्या सुपीक खोऱ्यातील प्रकारकरडी (पालोरा) : मोहाडी तालुक्याच्या पूर्व व पश्चिम टोकावरील ढिवरवाडा व बेटाळा शेतशिवार सध्या पोपट पीक बहरून निघाले आहे. वैनगंगा नदी खोऱ्यातील सुपिक पट्यात मोठ्या प्रमाणात हजारो एकर शेतात शेतकरी वर्गाने पोपट पिकाची लागवड केली असून पिक फुलोऱ्यावर आहे. चांगले उत्पन्न हाती लागण्याची अपेक्षा व्यक्त होत असताना मात्र पिकावर विविध किडी व रोगांनी आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.सन २०१५ च्या खरीप हंगामात पावसाने साथ दिली. दमदार धानाचे पिक शेतात हेलकावे घेवू लागले. मात्र निसर्गाला हे कदाचित मान्य नसावे. मोहाडी तालुक्यात धानाचे पीक परिपक्व होण्याच्या कालावधीत विविध रोग व किडीने आक्रमण करून हातचे पिक नेले. एकरी ३ ते ५ पोत्यांचे उत्पादन आले. मळणीच्या वेळी शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले. परंतु बळीराजाने हिंमत हरली नाही. उलट नव्या दमाने व जोमाने त्याने रब्बीची पेरणी केली. बेटाळा व ढिवरवाडा परिसरातील शेतकरी वर्गाने वैनगंगा शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पोपट पिकाची लागवड केली. सुपिक, काळ्या कसदार मातीत पिक जोमाने आले. दोन्ही टोकावरील वैनगंगेचे नदीकाठ पोपट पिकाने फुलून निघाले आहेत. हजारो एकरात पोपट पिकाची लागवड करण्यात आली असून चांगले पिक होण्याची अपेक्षा व्यक्त होत असताना धानाप्रमाणे किड व रोगांनी आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. पिक पिवळसर पडली असून किडीने पाने खाण्याचा धडाका सुरु केला आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना उपाय योजना सूचविण्याबरोबर अनुदानावर औषधांचा पुरवठा करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
‘पोपट’वर किडींचे आक्रमण
By admin | Published: January 03, 2016 1:12 AM