लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तीन जिल्ह्यात १२ जणांचा बळी घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या हल्लेखोर सीटी- १ वाघाने आपला मुक्काम लाखांदूर तालुक्याच्या इंदोरा जंगलातून जिल्ह्याच्या सीमेवरील वडसा जंगलात हलविला आहे. या वाघाला जेरबंद करण्यासाठी गत आठ दिवसांपासून वनविभाग प्रयत्न करीत असला तरी चलाख वाघ त्यांना सतत हुलकावणी देत आहे. यामुळे लाखांदूर तालुक्यातील गावांमध्ये वाघाची दहशत कायम असून वनविभाग वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे.चिमूर वनपरिक्षेत्रात जन्म झाल्याने सीटी- १ (चिमूर टायगर- १) म्हणून या वाघाची ओळख आहे. अडीच वर्षांच्या या वाघाने आतापर्यंत लाखांदूर, वडसा आणि ब्रम्हपुरी या भागात १२ जणांची शिकार केली आहे. सर्वात पहिली शिकार २७ जानेवारी रोजी लाखांदूर वनपरिक्षेत्रात केली होती. त्यानंतर विविध भागात हल्ले करून माणसांना ठार मारले. हल्लेखोर वाघाने शिकार करण्याची सवय बदलली असून तो रात्रीच्या वेळीच शिकार करतो. आपर्यंत बाराजणांचा बळी घेतल्याने तो जंगलात राहण्यायोग्य नसल्याच्या निष्कर्षाप्रत वनविभाग आले आहे. त्यामुळेच त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग जीवाचे रान करीत आहे. मात्र, तो हुलकावणी देत तीन जिल्ह्याच्या सीमावर्ती जंगलात भटकत आहे. तो कधीही जिल्ह्यातील जंगलात शिरण्याची शक्यता असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
लाखांदूर तालुक्यात मचाणीवर खडा पहारा
- इंदोरा जंगलात २० सप्टेंबर रोजी अरुण मंडल हा व्यक्ती वाघाच्या हल्ल्यात ठार झाला होता. त्यानंतर या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने आदेश दिले. शार्पशूटरसह वनविभागाच्या पथकाने जंगल पालथे घातले. इंदोरा जंगलात पाच ठिकाणी मचाण उभारून खडा पहारा देण्यात आला. तो या परिसरात आला की त्याला कोणत्याही परिस्थितीत बेशुद्ध करून जेरबंद करण्यासाठी वनविभाग प्रयत्न करीत आहे.
सीटी- १ वाघ सध्या वडसा भागात आहे. मात्र, भंडारा वनविभागाची गस्त सुरु आहे. त्याला बेशुद्ध करून पकडण्यासाठी कर्मचारी जंगलात तैनात आहे. वाघ टप्प्यात आला की त्याला जेरबंद करण्यात येईल. - राहूल गवई, उपवनसंरक्षक, भंडारा
सीटी-१ वाघ आणखी कुणाचा बळी घेण्यापुर्वी त्याला बेशुद्ध करून जेरबंद करणे आवश्यक आहे. वनविभागाचे त्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहे. नागरिकांनी जंगलात जाणे टाळावे.- शाहिद खान, मानद वन्यजीव रक्षक, भंडारा.