प्रवास भत्ता काढण्यासाठी मागितली लाच साकोली : येथील पंचायत समितीचे वरिष्ठ सहायक लेखाधिकारी केदार कठाणे याने सेवानिवृत्त मुख्याध्यापकाकडून स्वग्राम प्रवास भत्ता बिल काढून देण्यासाठी एक हजार रूपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. फिर्यादीने स्वग्राम प्रवास भत्त्याचे बिल काढण्यासाठी वरिष्ठ सहायक लेखाधिकारी केदार कठाणे याच्याकडे वारंवार चकरा मारल्या. मात्र कठाणे यांनी बिल काढण्यासाठी एक हजार रूपयाची लाच मागितली. या प्रकरणाची तक्रार भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदविली. दरम्यान, आज सोमवारला लाचलुपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यासह फिर्यादी साकोली येथे दाखल झाले. त्यानंतर फिर्यादीने कठाणे यांना भ्रमध्वनीवरून संपर्क साधला असता कठाणे यांनी तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात काम करीत असल्यामुळे तहसील कार्यालयातच या, असे सांगितले. तहसील कार्यालया समोर फिर्यादीकडून लाचेची रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. कठाणेविरूद्ध साकोली पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये कलम ७, १३, (१) (९), १३ (२) गुन्ह्याची नोंद करून अटक केली. सदर कारवाई पोलीस उपअधीक्षक दिनकर सावरकर, दिनकर ठोसरे, पोलीस निरीक्षक प्रदीप पुल्लरवार, पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, पोलीस हवालदार संजय कुरंजेकर, मनोज पंचबुद्धे, अश्विन कुमार गोस्वामी, शेखर देशकर, पराग राऊत यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)
सहायक लेखाधिकाऱ्याला हजाराची लाच घेताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2017 1:15 AM