पवनी : मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या आणि विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या पवनी येथील चंडिका माता मंदिरातील दानपेटी फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पवनी येथे चंडिका माता मंदिर आहे. या मंदिरात कुणी नसल्याची संधी साधून मंगळवारी चोरट्याने मंदिराचा मागील लोखंडी दाराचे कुलूप तोडले. त्यानंतर आतमध्ये प्रवेश करुन मंदिराच्या गर्भगृहाच्या स्टीलच्या दाराचे कुलूपही तोडले. आतमध्ये प्रवेश केला. चंडिका मातेच्या मूर्तीसमोर ठेवलेली स्टीलची दानपेटी राॅडने फोडली. दानपेटीतील पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. परंतु चोरट्याच्या हाती काहीही लागले नाही. दरम्यान हा प्रकार लक्षात आला. प्रवीण छगनलाल ठक्कर (६५) रा. शुक्रवारी वाॅर्ड आझाद चौक पवनी यांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पांगारे करीत आहेत. चोरीच्या घटना नेहमीच घडत असल्या तरी आता चोरट्यांची नजर मंदिरावर ही गेल्याचे दिसून येत आहे. पवनी शहरात अनेक मंदिरे असून त्यांच्या सुरक्षेबाबत पोलिसांनी दक्ष राहावे अशी मागणी केली जात आहे.