लाेकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : दरोड्याच्या हेतूने शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन अज्ञातांनी परसोडी (नाग) येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक इमारतीतील लोखंडी खिडकी तोडून बँकेत प्रवेश केला. मात्र, सायरनच्या आवाजाने घाबरून तब्बल अडीच तासांनंतर केवळ संगणक मॉडेम चोरून नेल्याची घटना घडली. सूत्रानुसार, दोन अज्ञात दरोडेखोरांनी बँकेत दरोडा टाकण्याच्या हेतूने खिडकी तोडून बँकेत प्रवेश केला. दरोडेखोरांनी शाखा व्यवस्थापकाच्या कक्षातून प्रवेश केल्याने लगेच सायरन वाजले. सायरनच्या आवाजाने घाबरून संबंधितांनी बँकेतील संगणक मॉडेम निकामी केले. मॉडेम निकामी करून बँकेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. तिजोरी फोडण्यात अपयश आल्याने तब्बल अडीच तासांनंतर पहाटे २.४६ वाजता दोन्ही दरोडेखोर घटनास्थळावरून पसार झाले. हा सबंध प्रकार बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सदर दरोडा दोन अज्ञात चोरट्यांनी टाकल्याचे बोलल्या जात आहे. या घटनेची माहिती सकाळी येथील नागरिकांसह बँक कर्मचाऱ्यांना होताच लाखांदूर पोलिसांना माहिती देण्यात आली.लाखांदूरचे पोलीस निरीक्षक मनोहर कोरेटी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विरसेन चहान्दे, पुंडलिक मस्के, पोलीस अंमलदार राहुल गायधने, संदीप बावनकुळे, भुपेश बावनकुळे आदी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह शाखा व्यवस्थापक व अन्य कर्मचाऱ्यांनी घटनेची पाहणी व पंचनामा केला. अज्ञात दरोडेखोरांनी केवळ संगणक मॉडेम चोरल्याचे आढळून आल्याने अज्ञातांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास येथील ठाणेदार मनोहर कोरेटी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.