लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शाळेत दिल्या जाणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळे त्रस्त एका सहायक शिक्षकानेशिक्षकांच्या बैठक खोलीत अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. वेळीच सहकारी शिक्षक धावून आल्याने त्यांचे प्राण वाचले. अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना तुमसर येथील जनता विद्यालयात शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. अनिल पतीराम मेश्राम (४२) रा. मॉडेल टाऊन रा. इंदोरा (नागपूर) असे शिक्षकाचे नाव आहे.शुक्रवारी सकाळी ११ वाजता सहायक शिक्षक अनिल मेश्राम हे शिक्षकांच्या बैठक खोलीत दाखल झाले. शाळेत मला मानसिक, आर्थिक त्रास देवून अपमानास्पद वागणूक देतात, असे म्हणून पेट्रोलची बॉटल काढली. पेट्रोल अंगावर ओतले. आग लावण्याकरिता माचीसची काडी घेतली. इतक्यात प्रसंगावधान राखून सहकारी शिक्षकांनी त्यांचा हात पकडला. त्यांना समजावून शांत केले. या घटनेने शाळेत एकच खळबळ माजली. मुख्याध्यापकांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी सहायक शिक्षक मेश्राम यांना घेऊन गेले.तत्पूर्वी सहायक शिक्षक अनिल मेश्राम यांनी दिलेल्या तक्रारीत, शाळेत मानसिक, आर्थिक व अपमानास्पद वागणूक देत असल्याचे नमूद केले आहे. सदर प्रकरणाची तुमसर पोलिसांनी चौकशी करून आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षक अनिल मेश्राम यांच्यावर ३०९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. शिक्षक मेश्राम यांची वैद्यकीय तपासणी केली तथा शाळेत येऊन पंचनामा केला.
सदर प्रकरणात सध्या चौकशी सुरू असून आत्मदहन करणाऱ्या शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित कारणांची सखोल चौकशी करण्यात येईल. या प्रकरणात दोषी आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल.-मनोज सिडाम, पोलीस निरीक्षक तुमसर.