मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुका रेतीघाटासाठी प्रसिध्द आहे. अकरापैकी सात रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया महसूल विभागाने सुरु केली आहे. मात्र पावसाळ्यानंतर वैनगंगा व बावनथडी नदीत तस्कारांनी अवैध उत्खनन करुन पात्र अक्षरश: पोखरुन काढले. अशा पोखरलेल्या रेतीघाटांचा आता कोट्यवधीत लिलाव होणार आहे.भंडारा जिल्हा महसूल प्रशासनाने रेती घाट लिलावाची प्रक्रिया सुरु केली आहे. तुमसर तालुक्यातील चारगाव, सोड्या, लोथी, ब्राम्हणी, तामसवाडी, आष्टी (अंजनविहीर), सक्करदरा येथील घाटांचा त्यात समावेश आहे. वैनगंगा व बावनथडी नदीपात्रावर रेतीघाट आहेत. यापूर्वीही या रेतीघाटांचे लिलाव झाले होते. कंत्राटदार तथा रेतीतस्करांनी रेती अक्षरश: पोखरुन काढली आहे. नदीपात्रात खोल खड्डे पडले आहेत. संपूर्ण नदीपात्र सध्या खड्डेमय झाले आहे. बावनथडी धरण पुर्णत्वास आल्यानंतर आणि कवलेवाडा बॅरेज तयार झाल्यावर रेतीची अतिशय कमी आवक आहे. किमान दोन वर्ष खंड दिल्यानंतर खनिकर्म विभागाकडून येथे रेतीघाट लिलावाला हिरवी झेंडी मिळत आहे. तालुक्यातील सोंड्या, चारगाव नदीपात्रात रेती साठाच उपलब्ध नाही. परंतु शासनाने लिलावापूर्वी सर्वेक्षण करुन उपलब्ध रेती साठा, पर्यावरण विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र घेऊन लिलाव प्रक्रिया राबविली. प्रत्यक्षात मात्र घाटाचे चित्र वेगळेच आहे.सर्वच रेतीघाटांची किंमत कोट्यवधी रुपयांची आहे. निश्चित गटातून रेती उपसा करायचा असला तरी सीमांकनाबाहेर उत्खनन केले जाते. आजपर्यंतचा तशा इतिहास आहे. रेती व्यवसाय करणारे गब्बर झाले असून प्रशासन व राजकीय मंडळींचा त्यांना वरधस्त असतो. कोण कोणता रेतीघाट घेणार हे आधीच ठरले असून त्यात भागीदार कोण राहील हे सुध्दा निश्चित झाले आहेत.
पोखरलेल्या रेतीघाटांचा लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 10:35 PM
भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुका रेतीघाटासाठी प्रसिध्द आहे. अकरापैकी सात रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया महसूल विभागाने सुरु केली आहे. मात्र पावसाळ्यानंतर वैनगंगा व बावनथडी नदीत तस्कारांनी अवैध उत्खनन करुन पात्र अक्षरश: पोखरुन काढले. अशा पोखरलेल्या रेतीघाटांचा आता कोट्यवधीत लिलाव होणार आहे.
ठळक मुद्देतुमसर तालुका : वैनगंगा व बावनथडी नदीपात्रात पावसाळ्यानंतर तस्करांनी केले बेसुमार उत्खनन