शालेय विद्यार्थ्यांना फटका : आरटीओनी दिले तोंडी आदेश भंडारा : शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या आॅटो चालकांवर आरटीओने कारवाईचा बडगा उगारला आहे. आरटीओने सर्वातील सर्व आॅटो बंद करण्याचे तोंडी आदेश दिले आहेत. त्यांच्या अशा कारवाईमुळे आॅटोचालकानी विद्यार्थ्यांना ने-आण करण्याची प्रक्रिया बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.२६ जूनपासून जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय सुरू झालेली आहे. शालेय जीवनाच्या पहिल्या दिवसापासून इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंट व मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या पाल्यांसाठी पालकांनी स्कूलबस तथा आॅटो लावलेले आहेत. स्कूल बस व आॅटोतून नियमाची पायमल्ली करून वाहतूक करण्यात येत असल्याचा प्रकरणातून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी १ जुलैपासून स्कूलबस व आॅटोवर धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत आरटीओकडून स्कूलबसला अभय देवून केवळ आॅटो चालकांवर कारवाई सुरू केली आहे. नियमानुसार, आॅटोतून विद्यार्थ्यांना स्कूलपर्यंत व तेथून घरापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आॅटोचालक पार पाडित आहे, असे असतानाही आरटीओकडून त्यांच्यावर कारवाईच्या नावाने दडपशाहीचे धोरण सुरू आहे. शहरात सुमारे ३०० आॅटोचालक, मारूती व्हॅन व मॅजिकसारख्या वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यात येत आहे. ही वाहतूक अनेक वर्षांपासून सुरळीत सुरू असताना कुठल्याही पालकाची त्यांच्याप्रती तक्रार नाही. अशा स्थितीत आरटीओकडून सुरू असलेल्या कारवाईमुळे त्यांच्यात कमालीची धास्ती पोहचली आहे. अनेककांनी कर्ज घेवून आॅटोची खरेदी केलेली आहे. विद्यार्थ्यांच्या ने-आण करण्यातून मिळत असलेल्या मिळकतीत आॅटोचे कर्ज फेडणे व कुटुंब चालविणे सुरू आहे. मात्र, आरटीओने अवलंबिलेल्या आॅटो चालकाविरूद्धच्या कारवाई विरोधात त्यांनी सोमवारपासून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक न करता आॅटो बंद आंदोलन पुकारले आहे. याबाबत शिष्टमंडळाने लोकमतजवळ आरटीओची कैफियत मांडली. शिष्टमंडळात शिवदास गायधने, सुनिल नवाडे, राजेश तुरस्कर, निशांत नवखरे, संभु नाकाडे, मंगेश तुरस्कर, प्रविण कापसे, शेखर शेंडे, नरेंद्र पटले व पवन दिवटे यांच्यासह आॅटोचालक व मालकांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)
आॅटो चालकांचा बंदचा इशारा
By admin | Published: July 04, 2015 1:22 AM