गोबरवाही परिसर हा तालुका मुख्यालयापासून तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर असून या परिसरात ४५ गावे येतात. जिल्हा परिषद प्रशासनाचे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आहे. या परिसरात आरोग्य विभागाने पंधरा वर्षांपूर्वी तीन लाखांचा निधी खर्च करून शवविच्छेदनगृहाचे बांधकाम केले होते. परंतु अजूनपर्यंत येथे एकाही शवाचे विच्छेदन करण्यात आले नाही. शवविच्छेदन करण्याकरिता तुमसर येथे जावे लागते. गोबरवाही येथे पोलीस ठाणे आहे. शासनाने त्या दृष्टिकोनातून येथे शवविच्छेदनगृहाचे निर्माण केले होते. सध्या इमारतीची दुरवस्था झाली असून काही दिवसानंतर ती भुईसपाट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा आरोग्य अधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी येथे दखल घेण्याची गरज आहे. शासकीय निधी खर्च करून येथे शवविच्छेदनगृह तयार करण्यात आले. त्यास रीतसर नियमानुसार परवानगी देण्यात आली. परंतु त्या शवविच्छेदनगृहाकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही. किमान या इमारतीची दुरुस्ती करून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपयोगाकरिता या वास्तूचा उपयोग करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दुसरीकडे अनेक शासकीय कार्यालये भाड्याच्या इमारतीत सुरू आहेत. किमान या कार्यालयांनाही इमारत शासनाने द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गोबरवाहीत शवविच्छेदन गृहाचेच झाले विच्छेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 4:25 AM