तथागत मेश्राम
वरठी : राजकारणात सत्ताधारी कुणीही असो शरदचंद्र यांचा दरारा कायम असायचा. शासकीय अधिकाऱ्यावर जबरदस्त पकड होती. कायदा व नियमांचा उत्तम अभ्यास असल्याने मुद्देसूद लढाई, सामाजिक व धार्मिक कार्यात चुकीच्या धोरणांवर कडक प्रहार करण्यास अग्रेसर होते. सामान्य माणसाच्या हक्कासाठी धडपड व कामगारांच्या हक्कासाठी प्रवाहाच्या विरुद्ध एकाकी लढा देणारा लढवय्या म्हणून शरदचंद्र वासनिक यांची ओळख होती. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, असे म्हणतात पण शरदचंद्र यांच्यापुढे ते उलट होते. त्यांच्या अकाली मृत्यूने सामान्यांसाठी लढणारा खरा योद्धा गमावला असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
शरदचंद्र वासनिक यांची २४ एप्रिलला अकाली एक्झिट झाली. शरदचंद्र हे प्रेमदास वासनिक यांचे चिरंजीव. प्रेमदास वासनिक यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत असलेल्या चळवळीत सक्रिय सहभाग होता. वडिलांचा सामाजिक कार्याचा वसा शरदचंद्र यांनी अविरत सुरू ठेवला. लहानपणापासून त्यांनी सामाजिक व धार्मिक चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविला. सार्वजनिक कार्यक्रमाचा आत्मा म्हणून त्याची ख्याती होती. कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेकांना घडवण्याचे काम त्यांनी केले. ९० च्या दशकात वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सामाजिक चळवळीच्या कार्याला विस्तारित स्वरूप दिले. सामान्य माणसाच्या हक्कासाठी त्यांनी विविध आंदोलने उभारली. सामान्य माणसांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देऊन त्यासाठी लढण्याची प्रेरणा त्यांनी दिली. प्रवाहाच्या विरुद्ध जाताना त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. समोर कुणीही असो लढताना नांगी टाकली नाही. यामुळे ते उपेक्षित राहिले. पण त्यांनी कधीच हिंमत सोडली नाही. पैसे, पद किंवा प्रतिष्ठा यामागे न धावता ते सदैव हक्कासाठी लढत राहत.
जिल्ह्यातील शेकडो बांधकाम व घरगुती कामगारां करिता ते देवदूत होते. विविध योजनेंतर्गत आर्थिक लाभ, मुलांना शिष्यवृत्ती यासह अनेक हक्काची जाणीव त्यांनी करवून दिली.
सॅनफ्लॅग व्यवस्थापन धारेवर
सॅनफ्लॅग व्यवस्थापनाला ते नेहमी धारेवर घेत. यामुळे त्यांचा मोठा प्रभाव होता. कंपनीमार्फत होणाऱ्या प्रदूषणासाठी त्यांनी मोठा लढा उभारला होता. सॅनफ्लॅग कंपनीत अनेक पुढारी फक्त स्वार्थासाठी लढले. पण शरदचंद्र हे नेहमी सॅनफ्लॅग व्यवस्थापनाच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध लढत राहिले. कामगार कायद्यांचा उत्तम अभ्यास असल्याने ते शोषित कामगारांचे मार्गदर्शक होते. त्यांनी अनेक जनहित याचिका न्यायालयात दाखल केल्या होत्या.
बॉक्स
सत्ताधाऱ्यांवर दरारा
राजकारणात त्यांना फारसे यश मिळाले नाही. राजकारण्यांशी त्यांचे फारसे जुळतही नसे. त्यांना समस्यांची जाण असल्याने सोडवण्यासाठी ते धडपडताना दिसत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारभाराचा त्यांना गाढा अभ्यास होता. ग्रामसभेत त्यांची आवर्जून उपस्थिती राहायची. ग्रामसभेत ते समस्या मांडून सत्ताधाऱ्यावर कडक प्रहार करीत. त्यांच्या बारीक नजरेतून कोणताही भ्रष्टाचार सुटत नसे. यामुळे सत्ताधाऱ्यावर त्यांचा नेहमी दरारा होता. कोणतेही निर्णय घेताना शरदचंद्र वासनिक यांना समोर ठेवून निर्णय घेणे त्यांनी भाग पाडले.
शेकडो कामगारांचा आधार
शासनाच्या कामगार कल्याण योजनेंतर्गत शेकडो कामगारांना त्यांनी सुविधा मिळवून दिल्या. कल्याणकारी योजनांपासून वंचित असलेल्या हजारो कामगारांना त्यांनी न्याय मिळवून दिला. शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी फॉर्म भरून देण्यापासून ते लाभ मिळवून देण्यापर्यंत सर्व कामे ते करीत होते.
बॉक्स
डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा पगडा
वासनिक यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा मोठा पगडा होता. चळवळीचे आत्मा म्हणून ते प्रसिद्ध होते. गावात होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांचे ते जनक होते. बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांनी संस्था स्थापन केली होती. धम्म प्रचारक समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम सांभाळले. शोषित व पीडित महिला-पुरुषांना एकत्रित करून, मार्गदर्शन करून त्यांना ताकदीने उभे करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.