रेंगेपार (कोहळी) येथील एका शेतकऱ्याच्या नावाने चिचटोला येथे अंदाजे एक हेक्टर शेतजमीन असून आजूबाजूच्या शेतकऱ्यांची तीन ते चार हेक्टर शेती तो बटईने करतो. आजघडीस या शेतजमिनीत ऊस आणि धान पिकाची लागवड केली आहे. वीज वितरण कंपनीकडून कृषी क्षेत्रास २४ तासांपैकी ८ तास वेळीअवेळी वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे पुरेशा प्रमाणात ओलित होत नाही. त्यामुळे सदर शेतकऱ्याने त्याच्या शेताजवळून जाणाऱ्या व गावठाणास २४ तास वीज पुरवठा करणाऱ्या खांबावर आकडा टाकून शेतकरी वीज चोरी करीत असल्याचे म्हणणे आहे. गत पाच वर्षांपासून त्याचा हा गोरखधंदा सुरु होता. या प्रकाराने गावकऱ्यांना अधिकचा भुर्दंड सहन करावा लागत असे. या प्रकाराची गावकऱ्यांनी वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता शेंडे यांना माहिती दिली.
१ एप्रिल रोजी ८ वाजताच्या सुमारास स्थानिक लाईनमन व इतर एक व्यक्तीसह कनिष्ठ अभियंत्याने धाड मारून वीज चोरी करताना या शेतकऱ्यास रंगेहाथ पकडून वायर जप्त केले. पण आठवडाभराचा कालावधी लोटून सुद्धा कसलीही कारवाई केली नाही. सत्ताधारी पक्षाचा एक स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रतिनिधी शेतकऱ्याचा पाठीराखा असल्यामुळे राजकीय दबावातून तर कारवाई दडपली जात नाही ना? अशी गावकरी शंका व्यक्त करीत आहे. यात अर्थकारणही झाल्याच्या गावात चर्चा होत असल्याने कारवाई थंडबस्त्यात असून कनिष्ठ अभियंत्यांची संशयास्पद भूमिका दिसून येते.