आॅनलाईन लोकमतभंडारा : मृत पावलेल्या मजुरांचे नाव मस्टरवर चढवून लाखो रुपये उचलून भ्रष्टाचार करणाऱ्या दोषी वनाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन पर्यावरण बचाव कृती संघर्ष समितीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले.मार्च २०१५ मध्ये भंडारा वन विभागातील सालेहेटी, नेरला, दिघोरी, आमगाव, डोडमाझरी व सर्पेवाडा येथील झुडपी जंगलात मिश्र रोपवनाचे काम करण्यात आले. या कामावर भोजराम दोडकू वरठे रा. सर्पेवाडा या मजुराचे नाव मस्टरवर लिहीण्यात आले होते. भोजराम वरठे हा इसम कामावरील तारखेच्या वर्षभरापुर्वीच मरण पावला आहे. या रोपवनाच्या कामावर ३ लाख ९९ हजारांचा निधी खर्च केल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले आहे. माहाका ते कोकणागड कक्ष क्रमांक १५१ मधील सुरक्षित वनात झाडाची पालवी येण्यासाठी फांद्या कापणे व जाळणे हे काम करण्यात आले. या कामावर नारायण दसाराम अंबादे रा. वाघबोडी या इसमाचे नाव मस्टरवर लिहीण्यात आले. या इसमाचेही निधन झाले आहे. त्याच्या नावानेही मोठी रक्कम उचलण्यात आली आहे.हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संबंधित वन अधिकारी, क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक यांच्यावर कारवाई करण्यासाठी वन विभागाला अनेकदा तक्रार करण्यात आली. परंतु, सर्व पुरावे असतानाही अद्याप एकावरही कारवाई निश्चीत करण्यात आली नाही. तथापि, या प्रकरणाची तक्रार पोलिसात करण्यात आली. परंतु, पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याने समितीने पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. या निवेदनात भंडारा वनपरिक्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक गौरी नेवारे, बिट रक्षक घुले, आर.के. देशमुख, डब्ल्यु. आर. खान व अन्य कर्मचाऱ्यांची नावे नमूद करण्यात आली आहेत. या कर्मचाऱ्यांनी मृत नारायण अंबादे याचा मुलगा संतोष याला हे प्रकरण उघडकीस आणू नये, म्हणून दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसे शपथपत्रसुद्धा संतोष अंबादे याने दिले आहे. सर्व पुरावे असतानाही कारवाईस का टाळाटाळ होत आहे, हा प्रश्न आहे. तथापि, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जावी, अशी मागणी पर्यावरण बचाव कृती संघर्ष समितीने पोलीस अधीक्षकांना केली आहे.
वनाधिकाऱ्यांवर कारवाईला टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 10:27 PM
मृत पावलेल्या मजुरांचे नाव मस्टरवर चढवून लाखो रुपये उचलून भ्रष्टाचार करणाऱ्या दोषी वनाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी,...
ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांना निवेदन : प्रकरण बोगस मजुरांचे