तुमसर : तुमसर गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील देव्हाडी येथील उड्डाणपुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. जड वाहतूक सुरू झाल्यानंतरच या पुलाची चाचणी पूर्ण होणार आहे. मुंबई येथील तज्ज्ञांचा अहवाल अजून संबंधित विभागाला मिळाला नाही अशी माहिती आहे. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत या पुलावरून जड वाहतूक सुरू करण्याच्या निर्णय संबंधित विभागाने घेतल्याची माहिती आहे.
मुंबई हावडा रेल्वे मार्गावर येथे रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. रेल्वेचे काम पूर्ण झाले त्यामुळे सदर पुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली. परंतु जड वाहतुकीला अजूनही येथे हिरवी झेंडी मिळाली नाही. त्यामुळे जड वाहतूक तेथून पर्यायी मार्गाने सुरू आहे. सदर पुलावरून जड वाहतूक सुरू झाल्यानंतरच या पुलाची चाचणी पूर्ण होणार आहे त्यामुळे संबंधित विभाग जड वाहतूक सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत सुरू करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
तज्ज्ञांच्या अहवालाची प्रतीक्षा: देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपूल हा दगडांचा असून त्यात भरावात राख घालण्यात आली होती. मागील तीन वर्षापासून राख पुलातून वाहून गेली. त्यानंतर येथील कंत्राटदाराने पडलेल्या खड्ड्यात राख व इतर साहित्य घालून ते बुजविले. परंतु राख किती प्रमाणात वाहून गेली त्याच्या होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन संबंधित विभागाने दिल्ली व मुंबईच्या तज्ञांना येथे बोलाविले होते. यापूर्वी दिल्लीचे पथक येथे तपासणी करून गेले. त्यानंतर मुंबईचे तज्ज्ञांचे पथक येथे येऊन त्यांनी संपूर्ण पुलाची पाहणी केली. त्यानंतर तज्ज्ञांच्या पथकाने नागपूर येथे अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंता यांची भेट घेऊन पूलाविषयी संपूर्ण माहिती दिली. मुंबई येथील तज्ज्ञांच्या पथकाच्या अहवालाची येथे आता प्रतीक्षा आहे.
४० कोटीचा पुल:
देव्हाडी येथील उड्डाणपूल बांधकामाकरिता ४० कोटी रुपये खर्च करण्यात आले त्यापैकी राज्य शासनाने २५ कोटी व रेल्वेने १४ कोटींचा निधी दिला तर राज्य शासनाने २३ कोटी रुपये दिले असून दोन कोटी रुपये कंत्राटदाराचे शिल्लक ठेवण्यात आले आहे.
पुलावर अंधाराचे साम्राज्य:
उड्डाणपूल बांधकाम करताना राज्य शासनातर्फे ३० फूट अंतरावर वीज खांब लावण्याची सुविधा करण्यात आली आहे. नियमानुसार सदर विजेचे बिल हे संबंधित ग्रामपंचायतीला भरावे लागणार आहे. परंतु ग्रामपंचायतीकडे एवढा निधी उपलब्ध राहत नाही. त्यामुळे उड्डाणपुलावरील विजेचे बिल कोण भरणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. सध्या उड्डाणपुलावर अंधाराचे साम्राज्य आहे हा पूल सुमारे एक किलोमीटर लांब आहे.