तुमसर : २१ व्या शतकात स्त्रियांनी सर्व क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली. याचे श्रेय महामानवांना जाते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दारे उघडून आमच्यासाठी प्रगतीचे दालन उघडे करून आम्हास अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य दिले. त्यातूनच नोकरी, शिक्षण, खेळ अशा अनेक क्षेत्रात संधी मिळाली. परंपरावादी दृष्टिकोन झुगारून आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारले. त्यातूनच स्त्री स्वावलंबी झाली. म्हणून पुढील पिढीसाठी स्त्री शक्तीचा जागर करणे हीच आमची नैतिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन शालेय कार्यक्रम प्रमुख प्रीती भोयर यांनी केले.
शारदा विद्यालय तुमसर येथील आयोजित जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक राजेश तिडके हे होते. या दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाला ‘वूमन एक्स्प्रेस’ हे नाव देण्यात आले होते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून ‘परिवर्तनीय नवं विचारांची महिला ट्रेन’ या कार्यक्रमाला राजेश तिडके यांनी हिरवी झेंडी दाखविली. शाळेतील सर्व महिला कर्मचाऱ्यांनी यात आपले अभिमत व्यक्त केले. स्त्री-पुरुष समानतेचे तत्त्व कागदावरच न राहता निर्णय प्रक्रियेमध्ये स्रियांचेही मत जाणून घेणे आवश्यक आहे. पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा आजही या एकविसाव्या शतकात दिसून येतो आहे. स्त्रियांनी आपली मानसिक गुलामगिरी झुगारून बौद्धिक प्रगल्भता येण्यासाठी आत्मीय विचार जोपासले पाहिजेत. बौद्धिक प्रामाण्यवाद जर आमच्या स्त्रियांनी अंगीकारले तर वास्तवात स्त्री-पुरुष समानता हे तत्त्व खऱ्या अर्थाने रुजेल, असे प्रांजळ मत कर्मचारी भगिनींनी मांडले.
कार्यक्रमामध्ये ऊर्मिला नेवारे, रेखा बडवाईक, ज्योती बावनकर, सीमा मेश्राम, नितूवर्षा घटारे, विद्या मस्के, रूपा रामटेके, माधवी खोब्रागडे, आदींनी सहभाग घेतलेला होता. कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, हे विशेष.