भंडारा : जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या जिल्हा, तालुका व गावांना राज्यस्तर, विभागस्तर व जिल्हास्तरावर पुरस्कार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबत शासन निर्णय नुकताच काढण्यात आला आहे. जलयुक्त शिवार अभियानाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवणे, लोकसहभाग वाढविणे, पाण्याचा ताळेबंद व कार्यक्षम वापर करण्यास ग्रामस्थांना प्रोत्साहित करणे, शासनाच्या योजना प्रभाविपणे राबविण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे जिल्हे, तालुके, गावे या पुरस्कारांसाठी पात्र ठरतील. राज्य स्तरावर महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार, तर जिल्हा स्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार या नावांनी हे पुरस्कार दिले जातील. जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट काम करणारी पाच गावे व दोन तालुक्यांना जिल्हास्तरावर दोन गावे, दोन तालुके व दोन जिल्ह्यांना विभागस्तरावर तर तीन गावे तीन तालुके व तीन जिल्ह्यांना राज्यस्तरावर हे पुरस्कार दिले जाईल. उत्कृष्ट लिखाणाने जलसंधारणाचे महत्त्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यात योगदान देणाऱ्या पत्रकारांना राज्य, विभाग व जिल्हास्तरावर पुरस्कार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबत शासन निर्णय झाला आहे. जलसंधारणाचे महत्त्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणरे पत्रकार आणि जलयक्त शिवार अभियानाची त्या त्या परिसरात जनजागृती करणे, अभियानात लोकसहभाग वाढविणे, पाण्याचा ताळेबंद व कार्यक्षम वापर, पाणलोटांच्या यशोगाथा प्रकाशित करणे इतर गावांना प्रोत्साहित करून पाणीप्रश्न सोडविण्यात योगदान देणारे पत्रकार या पुरस्कारासाठी पात्र राहणार आहेत. (शहर प्रतिनिधी)असे असतील पुरस्कारराज्यस्तरावरील पुरस्कारांसाठी निवडलेल्या गावांसाठी प्रथम पुरस्कार २५ लाख, द्वितीय १५ लाख, तृतीय ७.५ लाख रुपये व स्मृतिचिन्ह असा आहे. तालुक्यांसाठी पुरस्काराची रक्कम प्रथाम क्रमांक ३५ लाख, द्वितीय २० लाख, तृतीय १० लाख रुपये, स्मृतीचिन्ह असा आहे. जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक ५० लाख, द्वितीय ३० लाख, तृतीय १५ लाख रूपये व स्मृतिचिन्ह असे आहे.
जलयुक्त शिवार अभियानात योगदान देणाऱ्या गावांना पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2016 12:30 AM