लाखनी : लाखनी येथे मुख्य महामार्गावर तसेच शहराच्या इतर परिसरात ३२ व्या महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती अंतर्गत पोलीस स्टेशन लाखनी, वाहतूक विभाग भंडारा यांच्या पुढाकाराने आणि जेएमसी प्रोजेक्ट्स इंडिया लिमिटेड, ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लब लाखनी, अखिल भारतीय अंनिस तालुका शाखा लाखनी तसेच नेफडो जिल्हा भंडारा यांच्या सहकार्याने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
सर्वप्रथम लाखनी पोलीस स्टेशन येथे जेएमसीतर्फे तयार स्टॉलवर जनजागृती बॅनर लावलेले मिनी ट्रक सजविण्यात आला; तसेच सर्वच उपस्थित प्रामुख्याने पोलीस निरीक्षक संजय कोरचे, जेएमसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय प्रताप सिंह, जेएमसी सुरक्षा अधिकारी परेश घालनकर, वाहतूक पोलीस राजेंद्र लांबट व लोकेश ढोक, ॲड. शफी लद्धानी ,ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लबचे प्रा. अशोक गायधने, अशोक वैद्य यांनी रॅलीला संबोधित करून सर्व वाहनचालकांनी हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करावा, रस्ता सुरक्षेचे नियम पाळून अपघात टाळावे, असे आपल्या मार्गदर्शनातून संबोधिले.
यानंतर सहभागी सदस्य विद्यार्थी लाखनी मुख्य महामार्गावर तसेच सिंधी लाइन, लाखोरी रोड येथे फिरून लोकांमध्ये जनजागृती केली. यावेळी जेएमसीतर्फे रस्ता सुरक्षा नियमांचे पत्रक जनतेला व दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना वाटण्यात आले. विशेष म्हणजे महामार्गावर वाहतुकीचे, रस्ता सुरक्षेचे नियम पाळणारे हेल्मेटधारी, सीटबेल्टधारी वाहनचालकांना स्वतः पोलीस निरीक्षक, वाहतूक पोलीस; तसेच जेएमसीचे अधिकारी, कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ दिले. सिंधी लाइन चौकातसुद्धा मार्गदर्शन करण्यात आले. रॅलीचे संचालन परेश घालनकर व व्यापारी युनूस आकबानी यांनी तर प्रास्ताविक ॲड. शफी लद्धानी यांनी केले. रस्ता सुरक्षा अभियान रॅलीच्या यशस्वितेकरिता पोलीस स्टेशन, जेएमसीचे सर्व अधिकारी कर्मचारी, ग्रीन फ्रेंड्सचे छविल रामटेके, अर्णव गायधने, दीप रामटेके, अमर रामटेके, साहिल निर्वाण, गौरेश निर्वाण, प्रज्वल भांडारकर, नेहांत निंबारते, वंजारी इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.
Attachments area