भंडारा : स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलैपासून ‘लोकमत रक्ताचं नातं’ या रक्तदान मोहिमेला प्रारंभ होत आहे. या मोहिमेसंदर्भात भंडारा जिल्ह्यात पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत असून गुरुवारी भंडारा आणि तुमसर तालुक्यात ‘असर फाऊंडेशन’च्या सहकार्याने पथनाट्य सादर करण्यात आले.
रक्तदान महायज्ञ यशस्वी करण्यासाठी आणि अधिकाधिक नागरिकांनी यात सहभागी व्हावे म्हणून भंडारा जिल्ह्यात ही जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. असर फाऊंडेशनचे कलावंत पथनाट्यातून जनजागृती करत आहेत. भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौकात पथनाट्याचेे सादरीकरण करण्यात आले.
या पथनाट्यात वैभव कोलते, दीपक तिघरे, प्रणीत उके, हर्षल कुंभारे, प्रियंका कोलते, दामिनी सेलोकर, विशाल अड्याळकर, वैष्णवी सोनटक्के, विक्रम फडके आदी कलावंत सहभागी झाले होते. पथनाट्याच्या माध्यमातून कोरोना संकटकाळात रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष आशू गोंडाणे, सखी मंचच्या संयोजिका सीमा नंदनवार, बाल विकास मंचचे संयोजक ललित घाटबांधे उपस्थित होते.