भंडारा : कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत स्व. आर. जी. देशमुख कृषी महाविद्यालय, तिवसा, अमरावती येशील विद्यार्थिनी कृषिदूत ज्ञानेश्वरी जयपाल वंजारी हिने आसगाव परिसरातील शेतकऱ्यांना जलशैवाळासारखे दिसणारे तरंगते नेचे वनस्पती अझोला याचे पिकासाठी, पशुपालनासाठी तसेच दुधाळ जनावरांसाठी होणारे उपयोग पटवून सांगितले.
अवघे २ ते ३ सें. मी. आकाराची ही वनस्पती प्रचंड वेगाने वाढते. दर दोन दिवसांनी दुप्पट होण्याची क्रिया सतत सुरू असते.
अझोलाची गादी तयार करण्याची पद्धत, त्याचे व्यवस्थापन, अझोलातील पोषणमूल्ये, त्यांचे फायदे शेतकरी वर्गाला सुस्पष्ट केले.
धानाचे पीक घेतांना जैवखत म्हणून अझोलाचा पीक उत्पन्नवाढीत मोठा वाटा असतो. हवेतील नत्र जमिनीत रुजवून पिकाला पुरवठा केल्यामुळे पिकाच्या उत्पन्नात २० ते २५ टक्के वाढ होते. दुधाळ जनावरांना महागड्या खाद्याऐवजी अझोला खाऊ घातल्यास किफायतशीर व पौष्टिक होऊन दुधाची गुणवत्ता तसेच प्रत वाढविण्यात मदत करते. वरील उपक्रमासाठी आर. जी. देशमुख कृषी महाविद्यालय तिवसाचे प्राचार्य डॉ. आदिल कदम, प्रा. हेमंत पवार, प्रा. अनंत सरनाईक, प्रा. मनोज लुंगे यांनी विद्यार्थिनीस मार्गदर्शन केले.