ज्ञानेश्वर मुंदेलाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मुलांच्या भविष्याचा विचार करून उमेदीच्या काळात बंगला बांधला. सर्व कुटुंब सुखा-समाधानाने एकत्र राहत हाेतो. मात्र, गाेसे धरण बांधण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि आम्ही बाधित क्षेत्रात आलाे. पाच वर्षांपूर्वी घराचा माेबदला मिळाला. मात्र, अद्यापही हक्काचा प्लाॅट मिळाला नाही. आता बंगल्यात पाणी शिरले असून, आम्हाला भाड्याच्या घरात राहावे लागत आहे, अशी व्यथा ग्रामसेवक काॅलनीतील सेवानिवृत्त ग्रामसेवक बाळकृष्ण महादेव वैरागडकर सांगत हाेते. त्यांच्या बंगल्यात आता पाणी शिरले असून, या बंगल्याकडे शून्य नजरेने पाहत हाेते.गाेसेखुर्द प्रकल्पाच्या निर्मितीनंतर भंडारा शहरातील वैनगंगा तीरावर असलेली ग्रामसेवक काॅलनी बुडीत क्षेत्रात आली. पाच एकरांतील ५६ घरांपैकी २८ कुटुंबांना माेबदला देण्यात आला. मात्र, अद्यापही त्यांना प्लाॅट मिळालेला नाही. मुजबीजवळ प्लाॅट देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. १९७८ साली ही काॅलनी वसविण्यात आली. बहुतांश ग्रामसेवकांनी या काॅलनीत घरे बांधली. काहींनी आपल्या पूर्वीच्या घरांचे बंगल्यात रूपांतर केले. बाळकृष्ण वैरागडकर यांचेही येथे घर आहे. त्यांनी १९९० मध्ये घर बांधले. सध्या दुमजली घराच्या तीन फुटांपर्यंत बॅकवाॅटर शिरले आहे. त्यामुळे त्यांनी गत सहा महिन्यांपूर्वी घर साेडून त्याच परिसरात भाड्याचे घर घेतले. दहा जणांचे कुटुंब आता भाड्याच्या घरात राहत असून, हक्काचे प्लाॅट केव्हा मिळणार, याची प्रतीक्षा करीत आहे. ग्रामसेवक काॅलनीतील रहिवासींना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
अनेक कुटुंबांचे नाईलाजाने वास्तव्य- ग्रामसेवक काॅलनीत पाणी शिरणार हे पूर्वीच प्रशासनाने सांगितले हाेते, परंतु त्यांचे तत्परतेने पुर्नवसन झाले नाही. त्यामुळे आजही नाईलाजाने अनेक कुटुंबे येथे राहतात. माेहन चित्रीव आणि ययाती चित्रीव यांचे कुटुंब आजही वास्तव्याला आहे. ययाती यांच्या घरात पाणी शिरले आहे. त्यांनी घर साेडले, तर माेहन चित्रीव वरच्या मजल्यावर राहतात. दाेन फूट बॅकवाॅटरमधून वाट काढत त्यांना घर गाठावे लागते.
गाेसे प्रकल्पाची पातळी २४५.४४० मीटर- गाेसे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याचा निर्णय घेण्यात आला. १ नाेव्हेंबर धरण्याच्या जलपातळीत वाढ करणे सुरू झाले. २४५.५० मीटर या पातळीपर्यंत जलसंचय केला जाणार आहे. शुक्रवार, ७ जानेवारी राेजी या प्रकल्पाची पाणी पातळी २४५.४४० मीटरपर्यंत पाेहाेचली. त्यामुळे बुडीत क्षेत्रात जलवाटप माेठ्या प्रमाणात वाढले आहे. भंडारा शहरासह इतर भागांतही पाणी शिरत आहे.
कारधा पुल धाेक्याच्या पाणी पातळीजवळ- गाेसे प्रकल्पाच्या जलपातळीत वाढ हाेत असून शुक्रवारी वैनगंगा नदीच्या कारधा पुलाजवळ २४५.४० मीटर पाणी पातळी नाेंदविण्यात आली. धाेक्याची पातळी २४५.५० मीटर असून लवकरच ही पातळी गाठली जाणार आहे. वैनगंगेचे विशाल स्वरुप सध्या दिसत असून सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. मात्र या पुलावरुन धाेकादायक वाहतूक अद्यापही सुरु आहे.