५० संघटनांचा समावेश : दसरा मैदानावरुन जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचणार भंडारा : जातीय तेढ निर्माण करून जातीजातींमध्ये अविश्वास व द्वेश भावना पसरविण्याचे षडयंत्र सुरु आहे. अशा परिस्थितीमध्ये जातीविरहित समाजव्यवस्था निर्माण करण्याचे महापुरुषांचे कार्य पुढे नेणे ही सर्वांची जवाबदारी आहे. समाजातील जातीसमूह व घटकांचे एकत्रिकरण करून बहुजन समाजाच्या हक्क अधिकारांच्या समर्थनार्थ बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून रविवारी भंडाऱ्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्य संयोजक समीर कदम यांनी आज पत्रपरिषदेत दिली. वाढत्या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात ओबीसी, एस.टी., व्ही.जे.एन.टी., डी.एन.टी., बलुतेदार व धार्मिक अल्पसंख्यांक यांचा बहुजन क्रांती मोर्चा आयोजित केला आहे. रविवारला हा मोर्चा दसरा मैदान येथून निघणार असून तो जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचेल. तत्पूर्वी या मोर्चाला समर्थन दिलेल्या ५० विविध संघटनांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते दसरा मैदानावर एकत्रित होतील. तिथे उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात येईल. त्यानंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघेल. या मोर्चाच्या प्रमुख मागण्यांमध्ये कोपर्डी येथील अत्याचार करणाऱ्यावर व आश्रमशाळेतील विद्यार्थिनींवर अत्याचार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, पीडितांना संरक्षण देऊन न्याय द्यावा, देशात महिलांवरील होणारे अत्याचार रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात यावी, राष्ट्रीय स्तरावर एस.टी., एस.सी. प्रमाणे ओबीसी, भटके विमुक्त प्रवर्ग व बलुतेदार यांची जातीनिहाय जनगणना करावी, राखीव जंगलावरील नोकरीतील अनुशेष तात्काळ भरावा, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, मुस्लिम समाजाला सच्चर आयोगाच्या शिफारशी लागू करून १२ टक्के आरक्षण लागू करावे, ग्रामपातळीवर सेवा देणारे कर्मचारी यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. यापूर्वी अहमदनगर कोल्हापूर, पुणे, पालघर, नाशिक, रायगड, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात मोर्चा काढण्यात आला असून येत्या कालावधीत राज्यातील सर्व जिल्ह्यात विविध तारखेला मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधण्यात येणार असल्याची माहिती समीर कदम यांनी दिली. पत्रपरिषदेला प्राध्यापक वासनिक, बळीराम सार्वे, विलास खोब्रागडे, नरेंद्र मडावी, शीतल पिल्लेवान, सुधीर पिल्लेवान, माधवराव फसाटे, देवचंद वैद्य यांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)
भंडाऱ्यात बहुजन क्रांती मोर्चाची रविवारला धडक
By admin | Published: January 04, 2017 12:44 AM