पवनी येथील घटना : घटनेच्या निषेधार्थ आज पवनी बंदचे आवाहनपवनी : तालुक्यातील मांगली येथील रहिवासी व बजरंग दलाचा संयोजक तिलक वैद्य हा मित्रांसोबत चारचाकी वाहनाने खैरीदिवाण ते सेंद्री या मार्गाने जात असताना चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या चमूने वाहन अडवून त्यांना मारहाण केली. ही घटना बुधवारी दुपारी घडली. या घटनेचा निषेध म्हणून उद्या गुरूवारी पवनी बंदचे आवाहन बजरंग दल व शहर भाजपने केले आहे.भंडारा जिल्हा बजरंग दलाचे संयोजक तिलक वैद्य व त्याचा मित्र मंगेश पडोळे हे बुधवारी सकाळी ११ वाजता एमएच ३६ एच ६७७७ क्रमांकाच्या कारने खैरी दिवाण ते सेंद्री मार्गाने जात असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी एस.एस. गुजर, उपनिरीक्षक थुलकर, पी.एस. बोढारे, जितेंद्र आनंद, वाहन चालक जगन पुट्टलवार व मुन्ना शेख यांनी तिलक वैद्य यांचे वाहन तपासावयाचे सांगून थांबविले. वाहनात दारू आढळून आली नाही. परंतु तिलक वैद्य व त्याचा मित्र मंगेश पडोळे यांना पोलीस वाहनात टाकून वैद्य यांचे वाहन उपनिरीक्षक पी.एस. बोढारे व मुन्ना शेख यांनी ताब्यात घेतले. परत खैरी दिवाणमार्गे मांगलीकडे घेऊन गेले. खैरीदिवाण जवळ वाहन थांबवून तिलक वैद्यला कारमध्ये बसविले. हे वाहन पवनी पोलीस ठाण्यात नेत असल्याचे सांगून पवनीच्या दिशेला गेले. परंतु ते पवनी पोलीस ठाण्यात न जाता पवनी सावरलामार्गे ब्रह्मपुरीला जाणार होते. दरम्यान त्या चमूने वैद्यला कोदुर्ली गावाजवळ गाडीतून उतरवून बेदम मारहाण केली. यावेळी मुन्ना शेख व पीएसआय बोढारे यांच्या तावडीतून सुटून रस्त्याने जाणाऱ्या परिचिताच्या वाहनावर बसून वैद्य तिथून पसार झाला. याप्रकरणी पवनी पोलिसांना विचारले असता चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी पवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपासणीसाठी आल्याची माहिती पवनी पोलिसांना नाही. किंवा तिलक वैद्य याला नेत असल्याची कल्पानही नसल्याचे पवनीचे पोलीस निरीक्षक मधुकर गिते यांनी सांगितले. याप्रकरणी अधिकाऱ्याच्या या वर्तणुकीचा निषेध करण्यासाठी आणि फरार पोलीस उपनिरीक्षक बोढारे, मुन्ना शेख व इतर यांना अटक करण्याच्या मागणीसाठी गुरूवारला बजरंग दल व पवनी शहर भाजपने बंदचे आवाहन केले आहे. (तालुका/शहर प्रतिनिधी)
बजरंग दलाच्या जिल्हा संयोजकाला मारहाण
By admin | Published: February 09, 2017 12:24 AM