ग्रामीण बँकेतील प्रकार : पोलिसात तक्रारभंडारा : पैशाची बचत करताना ती बँकेतच ठेवल्यास त्याची परतफेड व सुरक्षा असते, असे म्हटल्या जाते. मात्र भंडारा शहरातील एका बँक खातेदाराला बँकेनेच ६५ हजार रूपयाने गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे बँकेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.संत कबीर वॉर्डातील सुरेश देवचंद चांदेवार या बँक खातेदाराला हा ६५ हजार रूपयांचा फटका बसला आहे. सुरेश यांचे शहरातील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत खाते आहे. त्यांचा खाते क्रमांक ५००४१०११००००६६६ हा असून १८ जून २०१६ ला त्यांनी स्वत:च्या खात्यात ६५ हजार रूपये जमा केले. त्याबदल्यात बँकेने त्यांना पैसे भरल्याची पावतीही दिली. मात्र त्यानंतर सदर रक्कम खात्यावर जमा करून घेण्याकरीता त्यांनी बँक कर्मचाऱ्यांना खातेपुस्तक दिले. परंतु त्यांनी खातेपुस्तकावर नोंद करण्यास टाळाटाळ केली. याबाबत त्यांनी बँक व्यवस्थापकांना विचारणा केली असता त्यांनी आठ ते १५ दिवसात पैसे खात्यावर जमा होईल, असे सांगितले. मात्र तेव्हापासून आजतागायत आठ महिन्यांचा कालावधी लोटूनही चांदेवार यांना त्यांची हक्काची रक्कम ना बँक खात्यात ना पासबुकवर जमा असल्याचे दाखविण्यात आले.याबाबत त्यांनी वारंवार बँकेत चकरा मारल्या. परंतु त्यांना पैसे भरलेच नसल्याचे रोखपाल सांगत असून त्यांनाच धमकी देत असल्याचे चांदेवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले. याबाबत चांदेवार यांनी शाखा व्यवस्थापक व शहर पोलीस ठाण्यात बँकेने त्याची ६५ हजार रूपयाने लुबाडणूक केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. याबाबत बँकेत भरलेल्या पैशाची पावती बँकेतून अधिकाऱ्यांनी गहाळ करून पैशांची विल्हेवाट लावण्यासाठी खटाटोप चालवला असल्याचा आरोप चांदेवार यांनी केला आहे. याबाबत बँकेत संपर्क साधला असता त्यांच्याकडून याप्रकरणी प्रतिसाद मिळाला नाही. (शहर प्रतिनिधी)
बँक खातेदाराला ६५ हजारांचा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2017 12:28 AM