तुमसर तालुक्यातील ४७ गावांची प्रमुख बाजारपेठ असणाऱ्या सिहोरा गावात संचारबंदी घोषित होताच व्यावसायिकांनी दुकाने बंद केली आहेत. दुकानांत होणाऱ्या गर्दीवर अंकुश घालण्यात आला आहे. परंतु बँकेत होणाऱ्या ग्राहकांच्या गर्दीने निश्चितच नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बँकेत शिरकाव करताना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. आत प्रवेश करताना एकाच ग्राहकाला सोडले जात आहे. परंतु दारावर गर्दी दिसून येते. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात येत नाहीत. सामाजिक सुरक्षा अंतर, मास्क, सॅनेटाईज करण्यात येत नाही. सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत बँका सुरू राहत असल्याने गर्दी वाढत आहे. कर्मचारी सुरक्षा बाळगत असले तरी ग्राहक मात्र नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. गावात दोन एटीएम असताना वारंवार बंद राहतात. त्यामुळे ग्राहकांची गर्दी बँकेत वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये केरकचरा तुंबला आहे. बँकेच्या अनियंत्रित प्रकारामुळे एटीएमची दर्जेदार सेवा ग्राहकांना मिळत नाही. यामुळे ग्राहक नाराज झाले आहेत.
बाॅक्स
राष्ट्रीयीकृत बँकेचा अभाव सिहोरा गावात बँक तथा पतसंस्था असून राष्ट्रीयीकृत बँकेचा अभाव आहे. गावात एकमेव बँक ऑफ इंडिया ही राष्ट्रीयीकृत आहे. यामुळे अनेक खातेदारांचे येथे बचत खाते आहे. एकच बँक असल्याने वाढती गर्दी राहत आहे. शासकीय योजनेची संपूर्ण खाती याच बँकेच्या अधीन ठेवण्यात आली आहेत. यामुळे सकाळपासून ग्राहकांच्या रांगा लागत आहेत. या बँकेत कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने ग्राहकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. ग्राहकांची वाढती गर्दी कोरोना संकट काळात कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतणारी असल्याने कर्मचारी भीतभीत कामे करीत आहेत.