लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विरली (बु.) येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतीलबँक मित्राने बायोमेट्रिक मशीनव्दारे ग्राहकांच्या खात्यातील रकमेची उचल केली. तर, काही ग्राहकांची रक्कम बँकेत जमा न करता परस्पर विल्हेवाट लावून लाखो रुपयांची अफरातफर केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याविषयी बँक मित्राने अफरातफर केल्याचे मान्य केले असून बँक व्यवस्थापनाने त्याला कामावरून कमी केले आहे. दया बँक मित्रावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.
परिसरातील ग्राहकांना घरपोच सेवा देण्यासाठी येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत सात बँक मित्र कार्यरत आहेत. यापैकी कऱ्हांडला येथील कैलास जनार्दन हटवार या बँक मित्र विरली (बु.) येथे बायोमेट्रिक मशीनव्दारे ग्राहकांकडून पैसे जमा करायचा. यावेळी तो अनेक विड्राल फॉर्मवर ग्राहकांच्या सह्या व अंगठे घेऊन नंतर या फाॅर्मच्या आधारे ग्राहकांचे पैसे ऑनलाइन पद्धतीने स्वत:च्या खात्यावर वळते करायचा. त्याचप्रमाणे बायोमेट्रिक मशीनव्दारे ग्राहकांच्या अंगठ्यांचा दुरुपयोग करून ग्राहकांच्या खात्यातील रक्कम आपल्या खात्यावर वळती करायचा आणि फिक्स डिपाॅझिटच्या बनावट पावत्या तयार करून बीसी कोडचे खोटे शिक्के मारून ग्राहकांची फसवणूक केली. गैरप्रकार करताना तो पेनाने ग्राहकांच्या पासबुकवर एंट्री करत असल्यामुळे याविषयी ग्राहकांना भनकही लागली नाही.
असे फुटले बिंग !
काही ग्राहकांना मोठ्या रकमेची गरज पडल्यामुळे ते थेट बँकेत गेले असता त्यांच्या खात्यावर रक्कम नसल्याचे आढळले. काही ग्राहकांच्या खात्यावर पेनाने लिहिलेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम असल्याचे आढळले. या ग्राहकांनी बँक व्यवस्थापकांकडे तक्रार करून दोषी बँक मित्रावर कारवाईची मागणी केली. याविषयी खातेदारांना कुणकुण लागताच एकापाठोपाठ अनेक खातेदारांनी आपल्या खात्यावरील रकमेची चौकशी केली असता बँक मित्राने अनेकांची फसवणूक करून लाखो रुपयांनी स्वत:चे उखळ पांढरे करून घेतले. ग्राहकांसमक्ष अफरातफर केल्याची बाब बॅंक मित्राने मान्य करून ग्राहकांना या रकमेचा परतावा करण्याचे कबूल केले आहे.
याप्रकरणी बँक व्यवस्थापनाने बँक मित्राकडील कार्यभार काढून घेतला असून सूचना फलकावर त्याविषयी सूचना दिली आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांनी थेट बँकेत येऊन संगणकाद्वारे आपल्या पासबुकवर व्यवहारांची नोंद करून घेण्याचे आवाहन केले आहे. या बँक मित्रावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी खातेदारांनी केली आहे.
याप्रकरणी सध्या चौकशी सुरू असून अफरातफर केलेल्या रकमेचा निश्चित आकडा सध्याच सांगता येणार नाही. बँक मित्र कैलास हटवार याने अफरातफर केल्याचे मान्य केले आहे. आम्ही त्याला कामावरून कमी केले आहे. त्याच्याकडून अफरातफर केलेल्या रकमेचा परतावा केला जात आहे.
-पी. ए. वासनिक, व्यवस्थापक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, विरली (बु.)