जिल्हा तापला: पारा ४२.५ अंशावरभंडारा : यंदा मार्च महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढली आहे. वाढत्या तापमानाने नागरिक हैराण झाले आहेत. भंडारा जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी उन्हाने जीवाची काहिली होत असून सूर्याने चाळिशीच्या वर मजल मारली आहे. शहर परिसरात गुरुवारी ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.राज्यात सर्वत्र उन्हाचा कहर सुरू असून, भंडाराही त्यापासून सुटले नाहीत. भंडारामधील उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला असून त्यामुळे सर्दी, खोकला, थंडी, संसर्गजन्य ताप, शरीरातील क्षार कमी होणे, चक्कर येणे, उष्माघात, गोवर, कांजण्या, नागीण आदी विविध प्रकारच्या आजारांनी डोके वर काढले आहेत. शहरातील खासगी, शासकीय दवाखान्यांत या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चालली असून, नागरिकांनी या वाढत्या तपमानात स्वत:ची काळजी न घेतल्यास आजाराची तीव्रता वाढण्याची शक्यता डॉक्टरमंडळींकडून वर्तविली जात आहे. अचानक वाढलेल्या या उष्म्यापासून नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांच्याकडून करण्यात आले आहे. उन्हामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे रस्ते दुपारी ओस पडू लागले आहेत. दुपारी बाजारपेठेतदेखील तुरळक ग्राहक दिसून येत आहेत. या वाढत्या तापमानामुळे दक्ष राहण्याच्या सूचना आरोग्यतज्ज्ञांनी दिल्या आहेत. शहर, तालुक्यात उष्णतेची लाट भडकली आहे. त्यामुळे दिवसा अघोषित संचारबंदी केल्याप्रमाणे रस्ते ओस पडत आहेत. शहर परिसरात गुरुवारी ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. बालरोगतज्ज्ञ डॉ. यशवंत लांजेवार यांनी लहान मुलांची उन्हाळ्यात विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, लहान मुलांना उष्माघाताचा धोका अधिक असतो. सकाळ, दुपारी, संध्याकाळी लहान मुलांना पाणी पाजणे महत्त्वाचे आहे. नवजात बालकांना दूध पाजणाऱ्या मातांनीदेखील पाणी भरपूर पिणे आवश्यक आहे. थंड पदार्थ लहान मुलांना देऊ नयेत. लाखनी येथील डॉ. देवेद्र धांडे यांनी सांगितले, की सध्या उन्हामुळे "डीहायड्रेशन"चा त्रास होणारे रुग्ण उपचारासाठी येत आहेत. त्यातच या भागात कांजिण्यांच्या रुग्णाची संख्या मोठी आहे. या रुग्णांना वाढत्या तापमानाचा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी बाहेरील थंड पेय घेण्यापेक्षा घरगुती लिंबू सरबत, पाणी भरपूर प्यावे. बाहेरील खाद्यपदार्थ कटाक्षाने टाळावेत, असे डॉ. धांडे यांनी सांगितले. (नगर प्रतिनिधी)
उन्हाच्या काहिलीने भंडाराकर बेजार
By admin | Published: March 31, 2017 12:25 AM