वैनगंगेच्या रेतीला सोन्यासारखा भाव नागपूर क्षेत्रात मिळतो, या रेतीला तिकडे खूप मागणी असल्याने रेती तस्कर साम, दाम, दंड, भेदाची नीती वापरून रेतीची तस्करी करतात. तालुक्यातील रोहा रेतीघाट बंद असल्याने व बेटाळा रेतीघाट लिलाव झाल्याने रेती तस्करांनी आपला मोर्चा निलज बूज व देव्हाडा रेतीघाटाकडे वळविला असून, सध्या हे दोन घाट रेती चोरासाठी वरदान ठरलेले आहे. देव्हाडा घाटातून दररोज पहाटेपासून सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत १० ते १२ ट्रॅक्टरद्वारे रेती नदी काठावर आणण्यात येते व नंतर जेसीबीने टिप्पर भरून तिरोडा, नागपूर, रामटेककडे पाठविली जाते. हीच स्थिती निलज बूज. घाटावर आहे. यासाठी रेती तस्कराकडून टिप्पर व ट्रॅक्टरच्या संख्येनुसार महसूल अधिकाऱ्यांना व पोलिसांना एक ठराविक रक्कम देण्यात येते. त्यामुळे महसूल व पोलीस अधिकारी या रेती तस्करावर कारवाई करीत नाही. एखाद वेळ गावकऱ्यांनी तक्रार केलीच तर त्याची सूचना रेती तस्करांना देऊन नंतर धाड मारली जाते, त्यामुळे एकही टिप्पर अथवा ट्रॅक्टर हाती लागत नाही. मात्र जे हप्ता देत नाही त्यांचे ट्रॅक्टर जप्त केले जाते. कारवाई केल्याची वाहवाही लुटली जाते. परंतु दिवस रात्र धावणाऱ्या या रेतीच्या टिप्परमुळे चांगले रस्ते खराब झालेले असून, धुळीमुळे रस्त्यावरील शेतकऱ्यांचे पीक धुळीने बर्बाद झाले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या अशा नाकर्तेपणामुळे त्या शेतकऱ्यांचा नुकसान होऊन सुद्धा त्यांचा नाईलाज आहे.
महसूल विभागाचे दुर्लक्ष
रेतीच्या या गोरखधंद्यात रेती तस्करासोबत, तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, ठाणेदार, बिट जमादार, स्थानीय गुन्हे शाखा व मायनिंग ऑफिसर या सर्वांचे उखळ पांढरे होत असल्यामुळे सर्वांनी गांधारीची भूमिका घेतलेली आहे.