आंतरराज्य पूल नादुरुस्त असल्यामुळे तो यापूर्वीच बंद करण्यात आला होता. त्यामुळे नदीपात्रात तात्पुरत्या रपटावरून दुचाकी, सायकल, ट्रॅक्टर व पायी ये-जा सुरू होती. रपटा वाहून गेल्यामुळे आता अखेरचा संपर्कही तुटला आहे. बावनथडी राजीव सागर आंतरराज्य प्रकल्पातून नदीकाठावरील गावातील पाणीटंचाई व शेतातील पिकाकरिता पाण्याचा विसर्ग गुरुवारी करण्यात आला. त्यामुळे कोरडे नदीपात्र पुन्हा जलमय झाले. नाकाडोंगरी येथील आंतरराज्य पूल कमकुवत असल्यामुळे यापूर्वीच वाहतुकीकरिता बंद केला. त्यामुळे जड वाहतूक सोबतच लहान वाहनांची वाहतूकसुद्धा बंद करण्यात आली होती. पुलाजवळून नदीपात्रात तात्पुरता कच्चा रपटा तयार करण्यात आला होता. त्यावरून मध्य प्रदेशातील व महाराष्ट्रातील नदीकाठावरील गावातील नागरिक दुचाकी व सायकलने तथा पायी ये-जा करत होते; परंतु पाणी विसर्गामुळे हा तात्पुरता रपटा पाण्यात वाहून गेला. त्यामुळे आता नागरिकांची ये-जा पूर्णत: बंद पडली आहे.
दोन्ही राज्यांतील नदीकाठावरील गावातील नागरिकांचे एकमेकांशी नातेसंबंध आहेत. त्यामुळे त्यांचे दररोज ये-जा सुरू असते. तात्पुरता रपटा हा महत्त्वपूर्ण आधार होता. पाणी विसर्गमुळे तोसुद्धा अखेरचा रस्ता बंद झाला आहे. दोन्ही राज्य शासनाने येथे दखल घेऊन किमान हलक्या वाहनांकरिता पुलावरून वाहतूक सुरू करावी, अशी मागणी पठार संघर्ष समितीचे संयोजक दीपक पुष्पतोडे यांनी केली आहे.
कोट
नाकाडोंगरी येथील आंतरराज्य पूल कमकुवत असल्यामुळे बंद करण्यात आला. पुलाजवळ असलेल्या रपटा पाण्याच्या विसर्गामुळे वाहून गेला. त्यामुळे बावनथडी पुलावरून हलक्या वाहनांना वाहतुकीस मंजुरी देण्यात यावी.
शंकर राऊत, तालुकाध्यक्ष काँग्रेस, तुमसर.