बावनथडी नदीचा उगम बालाघाट जिल्ह्यातील परसवाडा डोंगरात आहे. सुमारे ४६ किलोमीटरच्या अंतर पार करून तुमसर तालुक्याच्या सीमेत दाखल होते. महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमेतून वाहते. या नदीवर धरण बांधण्यात आले असून लाभक्षेत्रातील नदीचे पात्र पूर्ण कोरडे पडले आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या योजना संकटात सापडलेल्या आहेत. त्यामुळे पाण्याचे संकट उभे झाले आहे. मे महिन्यात नदीपात्रातून पाणी विसर्ग करण्याचे नियोजन करावे लागणार आहे.
बावनथडी नदी तुमसर तालुक्यातील बपेरा गावाजवळ वैनगंगा नदीला येऊन मिळते. या आंतरराज्य नदीतून मध्य प्रदेशातील नदीपात्रातून बेसुमार रेतीचा उपसा करण्यात आला. त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होऊन नदीपात्र दरवर्षी कोरडे पडत आहे. सध्या नदीपात्रात झुडपी वनस्पती वाढली आहे. जिकडे नजर टाकावी तिकडे झुडपी वनस्पती व रेती साठा दिसतो. त्यामुळे येथे वाळवंटाची आठवण येते.