मोहन भोयर
तुमसर (भंडारा) : तुमसर तालुक्याच्या सीमा मध्य प्रदेशाला भिडल्या असून, दोन्ही राज्यांच्या सीमेतून बावनथडी नदी वाहते. वर्षातून आठ महिने ही नदी कोरडी राहते. दोन्ही राज्यातील रेती तस्कर नदीपात्रातून अवैध रेतीचे उत्खनन करीत आहेत. मनमानी केलेल्या उपश्यामुळे नदीच मृत होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
राजरोसपणे या नदीपात्राला रेती तस्करांनी ओरबडणे सुरू ठेवलेले आहे. काही ठिकाणी नदीपात्राने तळ गाठला आहे. मातीसुद्धा दिसत आहे. यामुळे निसर्गाची प्रचंड प्रमाणात हानी होत असून, रेती तस्करांच्या वॉच सिस्टीममुळे नजर ठेवणारी प्रशासकीय यंत्रणा हतबल ठरत आहे.
बावनथडी नदीवर सितेकसा येथे धरण बांधण्यात आले आहे. वर्षातून या नदीपात्रात केवळ चार महिने पाण्याच्या प्रभाव सुरू राहतो, तर आठ महिने ही नदी कोरडी राहते. या संधीचा फायदा घेत दोन्ही राज्यातील रेती तस्कर या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचा उपसा करतात. मध्य प्रदेश शासनाने आपल्या रेतीघाटांचा लिलाव केला, परंतु महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील नदी गटांचा लिलाव मागील दोन वर्षांपासून झालेला नाही.
देवनारा घाटातून रेती तस्करी
तुमसर तालुक्यात शेवटच्या टोकावर देवनारा हे गाव आहे. गावाच्या शेजारून बावनथडी नदी वाहते. सीमावर्ती भागातील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचे उत्खनन मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे. रेती तस्करांना मूकसंमती दिली आहे काय? असा प्रश्न यावेयी उपस्थित होत आहे.
रेती तस्करांची वॉच सिस्टीम
सामूहिक रेती चोरी करण्याकरिता रेती तस्करांची स्वतःची एक वेगळी नेटवर्क आहे. त्याला रेती तस्करांची वॉच सिस्टीम असे कोडवर्डमध्ये म्हटले जाते. ही संपूर्ण यंत्रणा रेती तस्करांसाठी कार्यरत आहे. तस्करांनी व्हॉट्सॲप ग्रुप प्रणालीचा वापर केला आहे. त्याकरिता तरुण मंडळी या कामात गुंतलेली आहे. सहभागी तरुण एकमेकांना भ्रमणध्वनीवरून संदेश देतात. तिथे धाड मारल्यानंतर काहीच मिळत नाही. रेतीचा एक टिप्पर शहरात ३० हजारांना विक्री केला जातो.
पर्यावरणाचे नुकसान होत असताना महसूल प्रशासनाने रेती तस्करीवर आळा घालणे गरजेचे आहे. तरच नदीचे संरक्षण करता येईल.
-मो. सईद शेख, पर्यावरण तज्ज्ञ, भंडारा