मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे निर्देश : पोलीस विभागाच्या सहकार्याने ग्रामस्तरावर होणार अंमलबजावणीभंडारा : शौचालयाचे बांधकाम न करता उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांमुळे सामाजिक स्वास्थ बिघडत आहे. अशी कृती करून अनेकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्यांना आता वेळीच सावधान होण्याचा प्रसंग आला आहे. उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांविरुद्ध आता फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ११५ व ११७ अन्वये पोलीस कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यात उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांविरुद्ध यापुढे कायदेशिर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे यांनी दिले आहे. याबाबत जिल्ह्यातील भंडारा, मोहाडी, तुमसर, साकोली, लाखनी, लाखांदूर, पवनी या सातही पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना पत्रव्यवहार केला असून पोलीस विभागाच्या सहकार्याने ग्रामस्तरावर तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना यात दिलेल्या आहेत.स्वच्छ भारत मिशन ग्रामीण कार्यक्रमांतर्गत राज्यभर लाभार्थ्यांना वैयक्तिकस्तरावर स्वच्छतेची सुविधा उपलब्ध करण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. याच माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भंडारा जिल्हा सन २०१६-१७ वर्षात हागणदारीमुक्त करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार वार्षिक कृती आराखड्यामध्ये ४३२ ग्रामपंचायती समाविष्ट करून २०१२ च्या पायाभूत सर्व्हेक्षणानुसार ५९,५०१ वैयक्तिक शौचालयाचे उद्दिष्ट्ये निर्धारित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत सुमारे ४० हजार शौचालयाचे बांधकाम भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखनी, साकोली, लाखांदूर, पवनी पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये पूर्णत्वास आले आहे. उर्वरीत सुमारे २० हजार शौचालयाचे बांधकाम होणे आहे. राज्यात स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीकोणातून व गावे हागणदारीमुक्त करण्याच्या राज्यस्तर ते ग्रामपंचायतस्तरापर्यंत ग्रामविकास, शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा व स्वच्छता व अन्य विभागाची यंत्रणा कृतीशिल झाली असून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. तरीही बहुतांश गावातील कुटुंब शौचालयाचे बांधकाम करून त्यामध्ये शौचास जात नाहीत तर काही कुटुंब शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी पुढाकार घेत नसल्याचे दिसून येत आहे. स्वच्छतेची सुविधा उपलब्ध झाल्यानंतरही अनेक कुटुंब शौचास उघड्यावर जात असल्याने अन्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ११५ व ११७ अन्वये उघड्यावर शौचास बसणे, सार्वजनिक जागेवर सांडपाणी सोडणे, सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होईल अशी कुठलीही कृती करण्यास मज्जाव करण्यात आलेला असून या मध्ये रुपये १२०० पर्यंत दंड व कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक कुटुंबाने शौचालयाचा वापर करणे गरजेचे असून यामुळे गावातील उघड्यावरील हागणदारीचे समुळ उच्चाटण होऊन गाव स्वच्छ सुंदर व कुटुंबाचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत होणार आहे. स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून ग्रामस्तरावर शौचालयाचे बांधकाम, वापर व स्वच्छता ठेवण्यासाठी जनजागृती केल्या जात असताना काही नागरिक जाणीवपूर्वक उघड्यावर शौचास जात आहेत. तर अनेक कुटुंब शौचालयाचे बांधकाम करण्यास उदासीन दिसून येत आहेत.उघड्यावरील हागणदारीची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अहिरे यांनी शासन परिपत्रकाच्या संदर्भानुसार मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील ११५ व ११७ कलमान्वये ग्रामस्तरावर कार्यवाही करावी असे निर्देश दिलेले आहेत. याबाबत पंचायत समितीस्तरावर खंड विकास अधिकारी पंचायत समिती सर्व यांना पत्रव्यवहार करून उघड्यावरील हागणदारी बंद करण्यासाठी पोलीस विभागाच्या सहकार्याने तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. उघड्यावरील हागणदारी बंद करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अहिरे यांनी कठोर पाऊले उचलली आहे. ग्रामस्तरावर उघड्यावर हागणदारीला जाणाऱ्या नागरिकांनी वेळीच शौचालयाचे बांधकाम करून वापर करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे. घरी शौचालय असूनही उघड्यावर जाणाऱ्या नागरिकांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे उघड्यावर जाणाऱ्या नागरिकांनी वेळीच सावधान होण्याची पाळी आली आहे. (शहर प्रतिनिधी)
सावधान ! उघड्यावर शौचास बसाल तर कारवाई
By admin | Published: January 18, 2017 12:24 AM