भंडारा : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता चटपटीत पदार्थ म्हणजे पाणीपुरी. शहर असो की गावखेडे, चौकात पाणीपुरीचा हातठेला लागलेला. कोरोना संसर्गकाळातही पाणीपुरीच्या ठेल्यांवर खवय्यांची गर्दी दिसते. कोरोना नियमांचे पालन तर सोडा, स्वच्छतेचेही विक्रेत्याला वावडे असते. थेट अर्धा हात मटक्यात घालून ग्राहकाच्या प्लेटमध्ये पाणीपुरी दिली जाते. जिभेचे चोचले पुरविताना अनेक जण स्वत:चा जीव धोक्यात घालतात. पवनी तालुक्यातील भेंडाळा घटनेने पाणीपुरीचे वास्तव पुढे आले असले तरी बुधवारी भंडारा शहरातील अनेक स्टाॅलवर गर्दी कायमच होती.
पाणीपुरी हा शब्द उच्चारला तरी अनेकांच्या जिभेला पाणी सुटते. अनेक जण सहपरिवार पाणीपुरीचा आस्वाद घेण्यासाठी शहरातील स्टाॅलवर जातात. भंडारा शहरातच नव्हेतर, तालुका मुख्यालय आणि गावागावांत आता पाणीपुरीचे स्टाॅल लागलेले दिसून येतात. या स्टाॅलवर सायंकाळ झाली की मोठी गर्दी होते. कुणीही स्वच्छता आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत विचारणा करताना दिसत नाही. हातात प्लेट घेतली की डोळे मिटून गुपचूप खाणे तेवढे सुरू असते. विक्रेता हातात पुरी घेऊन मटक्यातील पाण्यात थेट बुडवून ग्राहकांच्या प्लेटमध्ये टाकतो. कोणताही विक्रेता हँडग्लोजचा वापर करताना दिसत नाही. त्याच हाताने इतर कामे करताना आलेल्या ग्राहकाला पाणीपुरी दिली जाते. येथे ना सॅनिटायझर असते ना विक्रेता मास्क लावलेला असतो.
पाणीपुरी तयार करण्यासाठी खाद्यपदार्थही निकृष्ट दर्जाचे वापरले जात असल्याची नेहमी ओरड होते. पाणीसुद्धा अशुद्ध आणि लगतच्याच हातपंपाचे किंवा प्लास्टीक ड्रममध्ये साठविलेले असते. स्टाॅलवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तर दिव्य असते. एका स्टीलच्या ड्रममध्ये पाणी आणि त्यावर एक मग ठेवलेला असतो. कुणीही यावे आणि थेट ड्रममध्ये मग बुडवून पाणी प्यावे अशी अवस्था असते. पुरीमध्ये टाकले जाणारे पाणी आंबट-गोड आणि तिखट असते. अनेकदा बेचव आणि झिनझिन्या आणणारे हे पाणी असते. अशा पाणीपुरीमुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी असतात. परंतु कुणीही अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे तक्रार करीत नाही. कोरोना काळ आहे. तो तरी कुठे व्यवसाय करणार? असे माणुसकीचे दर्शन घडवित चूपचाप पाणीपुरी खातात. मात्र, पवनी तालुक्यातील भेंडाळा येथील आठवडी बाजारातील पाणीपुरी खाल्ल्याने झालेला उद्रेक जिल्ह्याने अनुभवला. ७८ जणांना विषबाधा झाली. एका बालिकेचा बळी गेला. मात्र, त्यानंतरही कुणी यापासून धडा घेईल असे दिसत नाही.
अन्न व औषधी प्रशासनाचे दुर्लक्ष
खाद्यपदार्थ विकण्यापूर्वी स्टाॅलची रीतसर नोंदणी अन्न व प्रशासन विभागात करावी लागते. भंडारा शहरात साधारणत: ५० च्या जवळपास पाणीपुरी विक्रेते आहेत. परंतु यापैकी कुणीही अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे नोंदणी केलेली नाही. कुणी तक्रार करीत नाही म्हणून अन्न व औषधी प्रशासन विभागही या स्टाॅलच्या तपासणीसाठी पुढाकार घेत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार बिनबोभाट सुरू आहे. आतातर कोरोना संसर्गाचा काळ आहे. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. अशा स्थितीत पाणीपुरी विक्रेत्यांची तपासणी करून स्वच्छतेबाबत त्यांना निर्देश देणे गरजेचे आहे.