जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होईपर्यंत तरी जिल्हाधिकाऱ्यांनी रोहयो कामांना स्थगिती द्यावी, अशी मागणी शासकीय कर्मचारी वर्गातून होत आहे. भंडारा तालुक्यातील एका रोजगार सेवकाच्या व भंडारा पंचायत समितीतील रोहयो विभागाच्या व कृषी विभागातील एका लिपिकालाही कोरोनामुळे आपला कर्तव्यावर असताना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पूर्वीप्रमाणे परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत तरी रोहयो कामे सुरूच करू नयेत, अशी मागणी रोहयो विभागांशी संबंधित अधिकारी, कर्मचारी करू लागले आहेत.
एका रोजगार सेवकामुळे अनेक जण पॉझिटिव्ह झाले होते. त्यानंतर भंडारा तालुक्यातील एका रोजगार सेवकाला, एका पंचायत समितीतील रोहयो विभागाच्या व कृषी विभागातील एका लिपिकालाही कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागल्याने कर्मचारी वर्गातूनही संताप व्यक्त होत आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी काही दिवस रोहयो कामांना स्थगिती देण्याची मागणी आता गावागावांतून होऊ लागली आहे.
बॉक्स
रोहयो कामांवर सुविधा मिळणे अशक्यच
रोहयोची कामे सुरू केल्यास ही कामे कोरोनाचे हॉटस्पॉट केंद्र ठरू शकतात. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आणखी आकडा वाढल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. रुग्णालयात तसेच लसीकरणाच्या ठिकाणी गर्दी होत आहे. ग्रामीणमध्येही कोरोनाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा आकडा रोखायचा असेल, तर किमान आणखी काही दिवस तरी प्रशासनाने रोहयो कामांना स्थगिती देण्याची गरज आहे.
बॉक्स
प्रशासन जबाबदारी घेणार काय
शासनाने अद्यापही जिल्ह्यातील सर्व कृषी अधिकारी व इतर काही निमशासकीय कर्मचारी, सर्वच वयोगटातील नागरिकांना अद्याप कोरोनाचे लसीकरण केले नाही. अद्यापही कृषी विभागाचे कर्मचारी, शिक्षकांना, रोजगार सेवकांना कोरोना संकटात विमा सुरक्षा कवच दिलेले नाही. त्यामुळे रोहयोची कामे करताना जिल्ह्यात एखाद्या मजुराचा, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास जिल्हा प्रशासन त्याची जबाबदारी घेणार काय, असा प्रश्न ग्रामसेवक, कृषी सहायक, पंचायत समितीचे कार्यरत अधिकारी, कर्मचारी, रोजगार सेवक विचारत आहेत. रोहयो कामांमुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.