भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख २६ हजार ४१६ व्यक्तींच्या घशातील स्रावांची तपासणी करण्यात आली. त्यांपैकी १३ हजार ४७६ व्यक्ती काेराेना पाॅझिटिव्ह आढळून आल्या; तर १३ हजार १ व्यक्तींनी काेराेनावर यशस्वी मात केली. रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ९६.४७ टक्के आहे. ही जिल्ह्यासाठी समाधानाची बाब असली तरी पश्चिम विदर्भासह महानगरात काेराेना रुग्णांच्या संख्येत गत आठवड्याभरापासून वाढ हाेत असल्याचे दिसत आहे. त्या तुलनेत भंडारा जिल्ह्यात रुग्णसंख्या दाेन आकडीच आहे. सप्टेंबर-ऑक्टाेबर महिन्यांत रुग्णसंख्या तीन आकडी झाली हाेती. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात रुग्णसंख्या दाेन-तीन अशी दिसून येत हाेती. मात्र गत आठ दिवसांपासून रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली. त्यातही भंडारा शहरातील रुग्णांची संख्या अधिक असल्याचे दिसत आहे.
दि. १४ ते २० फेब्रुवारीपर्यंत ६९ रुग्ण आढळून आले. ६ ते १३ फेब्रुवारीपर्यंत केवळ २७ रुग्णांची नाेंद झाली हाेती. रुग्णसंख्या कमी हाेत असल्याने नागरिक बिनधास्त झाले आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन केले जात नाही. बाजारात माेठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. कुणीही मास्क लावताना आढळून येत नाही; यासाेबतच बाहेरगावाहून प्रवास करून येणाऱ्या रुग्णांमुळेही भंडारा शहरात रुग्णसंख्या वाढत असल्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ३२६ जणांचा मृत्यू झाला असून त्यात सर्वाधिक मृत्यू भंडारा तालुक्यातील १५३ आहेत. विशेष म्हणजे ५ हजार ६१५ काेरेाना रुग्ण आतापर्यंत एकट्या भंडारा तालुक्यात आढळले. त्यातही सर्वाधिक रुग्ण शहरातील आहेत. नागरिकांनीच आता काळजी घेणे आवश्यक आहे.
नागरिकांनी स्वत:हून तपासणीसाठी पुढे यावे
राज्यात सर्वत्र काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील नागरिकांनी आजाराची लक्षणे दिसल्यास स्वत:हून तपासणीसाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा आराेग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. अनेकदा नागरिक ताप, सर्दी, खाेकला असे आजार अंगावर काढतात. डाॅक्टरांकडे गेलाे तर काेराेना टेस्ट सांगतात. त्यामुळे अनेकजण रुग्णालयात जाण्याचे टाळतात. काहीजण स्वत:च उपचार करतात; तर काहीजण ग्रामीण भागात असलेल्या बाेगस डाॅक्टरांचा आधार घेतात. हा प्रकार टाळून नागरिकांनी तपासणीसाठी स्वत:हून समाेर येण्याची गरज आहे. तसेच कुणीही बाहेरगावाहून आले असेल तर स्वत:हून त्याने त्याची माहिती द्यावी, असे आवाहन आराेग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
सुपर स्प्रेडरकडे दुर्लक्ष
शहरात माेठ्या प्रमाणात गर्दी हाेत असताना सुपर स्प्रेडरची संख्या वाढत आहे. विविध सभांमध्ये सहभागी हाेणारे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, रस्त्यावर साहित्य विकणारे विक्रेते यांसह बाहेरगावाहून येणारे सुपर स्प्रेडर आहेत. त्यांनी काळजी घेतली तर भंडारा जिल्हा काेराेना नियंत्रणात यशस्वी ठरू शकताे.