आॅनलाईन लोकमतभंडारा: आजचे युग इंटरनेट व स्मार्ट फोनचे आहे. सगळे व्यवहार व संवाद इंटरनेटच्या उपयोगाने व्यापले आहे. अशा परिस्थितीत सायबर जगात चांगल्या व्यक्तीसोबत वाईट प्रवृत्तीसुध्दा सक्रीय आहेत. केवळ आर्थिकच नाही तर भावनिक, सामाजिक व नात्यांची फसवणूक सायबर क्षेत्रात मोठया प्रमाणात वाढली आहे. इंटरनेटच्या मायाजाळात वावरतांना सायबर क्षेत्रातील वाईट प्रवृत्तीपासून सावध रहा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केले.ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र प्रकल्पांतर्गत भंडारा जिल्हा पोलीस दल व जिल्हा माहिती कार्यालय, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर गुन्हयांविषयी जनजागृती या विषयावर युवक-युवती, माध्यम प्रतिनिधी व पालक यांच्यासाठी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, यावेळी त्या बोलत होत्या. अप्पर पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर, उपअधिक्षक गृह सुनिल कुळकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, आयसीआयसी बँक व्यवस्थापक कमलेश वालदे व सायबर तज्ञ मुकेश कवटघरे, पोलीस निरिक्षक सुरेश धुसर, प्रमोद रहांगडाले उपस्थित होते.मोबाईलचा वापर करतांना आपण बºयाच वेळी काळजी घेत नाही. याचाच फायदा सायबर गुन्हेगार घेत असल्याचे विनिता साहू यांनी सांगितले. व्हॉटअप्, व्टिटर, फेसबुक या सारख्या समाज माध्यमावर आपली वैयक्तिक माहिती, छायाचित्र, स्टेट्स टाकतांना अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषत: महिला व मुलींनी या विषयी अधिक काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.समाज माध्यमावर वावरतांना अनोळखी माणसांपासून सावध राहणे गरजेचे आहे. समाज माध्यमावर अनेक सायबर गुन्हेगार खोटे प्रोफाईल बनवून धोका देण्याचे काम करीत असतात त्यामुळे खात्री असल्याशिवाय कुणाचीही फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारु नका, असा सल्ला साहू यांनी दिला. सायबर क्षेत्रातील आर्थिक फसवणूकीच्या घटनांमध्ये इतर राज्यातील गुन्हेगार मोठया प्रमाणात असून अनोळखी कॉलला कुठलीही माहिती शेअर करु नका, असे त्या म्हणाल्या. इतरांसोबत घडलेला सायबर गुन्हा माझ्यासोबत घडणार नाही. ही धारणा न ठेवता सोशल मिडियाचा गैरवापर टाळा, खात्रीविना कोणतेही मॅसेज किंवा पोस्ट इतरांना प्रसारित करु नका. आक्षेपार्ह पोस्ट तात्काळ डिलीट करा, आमिषाला बळी पडू नका असे सांगून सतत सजग रहा, सावध रहा व काळजीपूर्वक व्यवहार करा, असे आवाहन साहू यांनी केले.व्यवस्थापक कमलेश वालदे यांनी उपयुक्त माहिती दिली. कोणत्याही अनोळखी व्यक्ती किंवा कंपनीकडून आलेल्या ई-मेलवर क्लिक करु नका, आपला गोपनीय डाटा शेअर करु नका, पासवर्ड व पीन कुणालाही देवू नका, बँक डिटेल्स देवू नका, एटीएम व्यवहार काळजीपूर्वक करा, असे ते म्हणाले.सायबर फॉरेन्सिक आणि सायबर क्राईम याबाबत मुकेश कवटघरे यांनी मार्गदर्शन केले.
वाईट प्रवृत्तींपासून सावध रहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 11:05 PM
आजचे युग इंटरनेट व स्मार्ट फोनचे आहे. सगळे व्यवहार व संवाद इंटरनेटच्या उपयोगाने व्यापले आहे.
ठळक मुद्देविनिता साहू : युवक व माध्यमांसाठी कार्यशाळा