थकित वीज देयके न भरल्यास थेट वीज जोडणी कापण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आधीच एकत्रितपणे अवाजवी देयके पाठविल्याने अडचणीत आलेले वीज ग्राहक संतप्त झाले आहेत. त्यांच्या रोषाचा सामना आता वीज वितरण विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. याचा प्रत्यय शुक्रवारी रेंगेपार कोहळी येथे आला. थकीत वीज देयके वसुलीची मोहीम राबविण्याकरिता कनिष्ठ अभियंता मुकुल श्रीराम शेंडे, वीज तंत्रज्ञ शीतल आत्राम व राजेश पुरुषोत्तम मते रेंगेपार कोहळी गावात गेले होते. हे पथक गावातील दोन वीज ग्राहकांची जोडणी कापल्यानंतर लीलाधर लक्ष्मण बोरकर यांच्या घरी पोहोचले. ६४६७ रुपयांची थकबाकी असल्यामुळे वीज जोडणी कापण्याकरिता वीज तंत्रज्ञ राजेश मते खांबावर चढले असता लीलाधरचा भाऊ सुनील बोरकरणे याने त्यांचा पाय ओढला. कनिष्ठ अभियंता मुकुल शेंडे आडवे आले असता कनिष्ठ अभियंता शेंडे यांनाही मारहाण करण्यात आली. या घटनेची तक्रार कनिष्ठ अभियंता शेंडे यांनी लाखणी पोलिसात दिली. त्यांच्या तक्रारीवरून सुनील बोरकर यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी भादंवि कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वीजजोडणी कापण्यास गेलेल्या कनिष्ठ अभियंत्याला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 4:33 AM