वृध्द गंभीर : नवेझरीत शेळ्यांची शिकारतिरोडा : अर्जुनी तालुक्यातील मोरेगाव येथील ६० वर्षीय वृध्द तेंदूपत्ता संकलनासाठी रामघाट परिसरात जात असताना अचानक अस्वलाने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी पहाटे ६ वाजतादरम्यान घडली. जखमी वृध्दाचे नाव पाडुरंग मांगलू शहारे आहे. नेहमीप्रमाणे पांडुरंग शहारे तेंदुपत्ता संकलनासाठी सकाळी ६ वाजता एकटेच रामघाट जंगल परिसरात गेले. झुडपामध्ये मादा अस्वल पिल्लासह होती. तिने अचानक वृध्दावर प्राणघातक हल्ला केला. शहारे यांनी स्वत:ला वाचविण्याचे प्रयत्न केले. मात्र अस्वलाने त्यांचा डावा डोळा फोडून उजवा हात आणि कपाळावर नखांनी जखमा केल्या. जवळील लोकांनी त्यांना मदत करून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी रहांगडालेनी १५ हजार रुपयांची तत्काळ मदत देऊन शासकीय मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. पाण्याच्या शोधात श्वापदे गावाशेजारी येतात म्हणून जंगलाजवळील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनपरिक्षेत्राधिकारी रहांगडाले यांनी केले. (प्रतिनिधी)बिबट्याचा धुमाकूळ सुरूचनवेझरी येथे तीन दिवसांपासून बिबट्याला धुमाकूळ सुरू असून दोन शेळ्या दोन दिवसात ठार केल्या. दि. २९ च्या रात्री दीपक शहारे यांचे घरी झोपडीत शेळी बांधलेली होती. रात्री अचानक बिबट्याने ठार केले. शेळीच्या आवाजाने घरचे लोक उठले व ओरडण्याने बिबट्या पसार झाला. पुन्हा दुसऱ्या दिवशी गोपीचंद उके यांची शेळी रात्री ठार केली. तेव्हा सुध्दा लोकांनी आरडाओरड करून बिबट्याला पळविले. त्याच रात्री विजय पारधी यांचे घरी शेळीवर हल्ला करण्याआधी आलेल्या बिबट्याला लोकांनी पळविले. वनरक्षक आय.आर. पठाण, धनराज ठवकर, दुधराम उके, विष्णू उके व इतर लोकांचे सहकार्याने लोकांना जागवून सतर्क केले. त्यामुळे कोणतीही मानव हानी झाली नाही.
बिबट, अस्वलाचे हल्ले सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2016 1:00 AM